नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर असताना भाजपने तयारी सुरु केली आहे. भाजरने आपल्या जुन्या मित्रपक्षांना एकत्र करण्यासाठी कंबर कसली आहे. एनडीएमधून बाहेर पडलेले अनेक पक्ष आता पुन्हा एकदा भाजपसोबत येण्याची शक्यता आहे. याची सुरुवात बिहार पासून झाली आहे. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशनंतर आता हरियाणामध्ये ही काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये विरोधकांना मोठा धक्का दिल्यानंतर आता हरियाणामध्येही भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला धक्का देण्याची तयारी केली आहे.
काँग्रेसचे मोठे नेते भाजपच्या वाटेवर आहेत. कुरुक्षेत्राचे माजी खासदार नवीन जिंदाल आणि त्यांची आई सावित्री जिंदाल हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. नवीन जिंदाल हे देशातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत आणि त्यांची आई सावित्री जिंदाल या देशातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. सध्या ते काँग्रेसमध्ये आहे. एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीनंतर हे दोन्ही दिग्गज काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
जिंदाल कुटुंब हिसारमध्ये महाराज अग्रसेन मेडिकल इन्स्टिट्यूट चालवतेय. नॅशनल मेडिकल कमिशनने या संस्थेला नुकतेच उत्तर भारतात प्रथम क्रमांकाचे मानांकन दिले आहे. त्यामुळे जिंदाल समूह आणि जिंदाल कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांची फोटो असलेली जाहिरात देऊन त्यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे जिंदाल कुटुंब आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
काही दिवसापूर्वी नवीन जिंदाल हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिसले होते. नवीन जिंदाल कुरुक्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवू शकतात. अशी चर्चा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली होती. त्यांनी राज्यातील सर्व 10 जागा जिंकल्या होत्या. हरियाणात पक्षाला 58.21 टक्के मते मिळाली होती, तर काँग्रेसला केवळ 28.51 टक्के मते मिळाली होती. अशा परिस्थितीत नवीन जिंदाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास ते पक्षासाठी बुस्टर डोससारखे असणार आहे.
भाजपने उत्तर प्रदेशमध्ये आरएलडी पक्षाला आपल्या सोबत घेण्याची देखील तयारी केली आहे. दोन्ही पक्षाची युतीची घोषणा लवकरच होऊ शकते. बिहारमध्ये आधीच इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. आंध्रेप्रदेशात टीडीपीला सोबत घेण्याची तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आधीच भाजपसोबत आला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला एकामागे एक मोठे झटके लागत आहेत. नवीन जिंदाल आणि त्यांच्या आई यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर याचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो.