सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सरकारने 41 औषधांच्या किंमती केल्या कमी

| Updated on: May 17, 2024 | 4:55 PM

सरकारने अनेक औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या औषधांमध्ये अनेक महत्त्वाच्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे.

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, सरकारने 41 औषधांच्या किंमती केल्या कमी
Follow us on

सरकारने मधुमेह, हृदय आणि यकृत संबंधित महत्त्वाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 41 औषधांच्या आणि सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) च्या 143 व्या बैठकीत अत्यावश्यक औषधांच्या किंमती जनतेला परवडाव्यात म्हणून हा निर्णय घेतला आहे.

भारतात 10 कोटींहून अधिक मधुमेही रुग्ण

फार्मा कंपन्यांना विविध औषधांच्या कमी किमतींची माहिती डीलर्स आणि स्टॉकिस्टना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या औषधांसाठी आता कमी किंमत मोजावी लागणार आहे त्यात अँटासिड्स, मल्टीव्हिटामिन्स आणि अँटीबायोटिक्सचा समावेश आहे.

अँटासिड्स हे औषध अपचनापासून आराम देण्याचे काम करतात. मल्टीविटामिन रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. प्रतिजैविक ही औषधे आहेत जी बॅक्टेरियाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरली जातात. जगात मधुमेहाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. 10 कोटींहून अधिक मधुमेही रुग्णांना औषधांच्या किंमतीत कपात केल्याचा सरळ फायदा होणार आहे.

गेल्या महिन्यात, फार्मास्युटिकल्स विभागाने 923 औषधांच्या फॉर्म्युलेशनच्या वार्षिक सुधारित किमती आणि 65 फॉर्म्युलेशनच्या किरकोळ किमती सुधारित केल्या होत्या. या किमती १ एप्रिलपासून लागू झाल्या आहेत.

८ कोटी लोकांना बीपीचा त्रास

देशातील 8 कोटींहून अधिक लोकांना बीपीचा त्रास आहे. याशिवाय गॅस, व्हिटॅमिन डी किंवा इतर जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देण्यात येणाऱ्या औषधांचा व्यवसायही दरवर्षी वेगाने वाढत आहे. अंदाजानुसार, NPPA च्या या निर्णयामुळे 30 कोटींहून अधिक लोकांना या औषधांच्या किंमती कमी केल्याने थेट दिलासा मिळणार आहे.