Petrol-Diesel Price : देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष ३ डिसेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुका होणार आहेत. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. त्यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. कारण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात. कारण भारताने तब्बल 3 वर्षांनंतर एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे देशाला कच्चे तेल स्वस्त मिळणार आहे.
भारतातील पेट्रोलियम रिफायनरींनी पुन्हा व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आहे. याचा फायदा चीनलाही होणार आहे. तेथील बहुतांश कंपन्यांनी मध्यस्थांच्या मदतीने कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेने लादलेले निर्बंध शिथिल केल्यामुळे हे शक्य झाले आहे.
रॉयटर्सच्या बातमीनुसार, जगातील सर्वात मोठ्या पेट्रोलियम रिफायनरीची मालकी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने या संदर्भात व्हेनेझुएलाशी थेट करार करणे अपेक्षित आहे. या संदर्भात कंपनीचे अधिकारी पुढील आठवड्यात व्हेनेझुएलाच्या सरकारी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. सध्या कंपनीने व्हेनेझुएला येथून 3 कच्च्या तेलाचे टँकर बुक केले आहेत. ते तेथून डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 मध्ये भारताला रवाना होतील.
2019 मध्ये अमेरिकेने व्हेनेझुएलावर निर्बंध लादण्यापूर्वीच, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी लिमिटेड नियमितपणे व्हेनेझुएलातून कच्चे तेल आयात करत होते. कमोडिटी मार्केट अॅनालिटिक्स फर्म कॅप्लरच्या मते, व्हेनेझुएलाचे कच्चे तेल नोव्हेंबर 2020 मध्ये भारतात आले होते.
व्हेनेझुएला हा भारताला कच्च्या तेलाची निर्यात करणारा पाचवा सर्वात मोठा देश होता. त्यात जगातील सर्वात मोठे कच्च्या तेलाचे साठे आहेत. त्यामुळे तिथून तेल आयात करणे भारतासाठी स्वस्त आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाला दिलेल्या सवलतीमुळे पुढील ६ महिने मुक्तपणे आणि मर्यादेशिवाय कच्च्या तेलाची निर्यात करता येणार आहे.
व्हेनेझुएला कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेकचा सदस्य आहे. आता बंदी उठवल्यामुळे बाजारात तेलाचा पुरवठा वाढणार असून, त्यामुळे किमती खाली येतील. त्यामुळे भारतातील इतर रिफायनरी कंपन्यांनाही स्वस्त तेल मिळेल आणि त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत घसरणीच्या रूपात दिसून येईल. बंदीपूर्वी भारत व्हेनेझुएलातून 16 दशलक्ष टन कच्चे तेल आयात करत असे. भारत आपल्या गरजेच्या 85% कच्च्या तेलाची आयात करतो.