गाझियाबादः अंधश्रद्धेच्या (Superstitious)आहारी जाण्याचा एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) समोर आलाय. कोशंबी जिल्ह्यात एका भक्तानं थेट स्वतःची जीभच छाटून देवीसमोर ठेवली. कोशंबी येथील शक्तिपीठ कडा धाम येथील शीतला मातेच्या मंदिरात (Temple) हा धक्कादायक प्रकार घडला. आज शनिवारी सकाळी सदर व्यक्ती, त्याच्या पत्नीसोबत मंदिरात आला होता. मात्र पतीने देवीला नमस्कार केल्यानंतर थेट खिशातून ब्लेड काढली आणि जीभ छाटून देवीसमोर ठेवली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संपत आणि बन्नोदेवी हे दाम्पत्य हे पती पत्नी आज सकाळी कऱ्हा येथील शीतला माता मंदिरात गेले होते.
मंदिराजवळ गंगेत डुबकी मारल्यानंतर दोघेही मंदिराच्या दिशेने निघाले.
देवीचं दर्शन घेतलं. प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर देवीसमोर पुन्हा एकदा हात जोडले. त्याचवेळी संपतने एकाएकी खिशातून ब्लेड काढली आणि जीभ कापली.
थरारत्या हातानं रक्तबंबाळ अवस्थेतील जीभ हातात घेतली आणि मंदिराच्या उंबऱ्यावर ठेवली. हे दृश्य पाहून पत्नी प्रचंड घाबरली. तिला कापरं भरलं. परिसरातील उपस्थित भाविक मदतीला धावले.
या घटनेनंतर संपतला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पत्नीनं पोलिसांना याविषयी अधिक माहिती दिली. शुक्रवार रात्रीपासूनच संपतने मंदिरात जाण्यासाठी हट्ट धरला होता. शनिवारी सकाळीच दोघे दर्शनासाठी गेले.
मात्र संपतने नेमक्या कोणत्या नवसासाठी देवीसमोर अशा प्रकारे जीभ कापून ठेवली, हे पत्नीलाही ठाऊक नाही. मात्र त्याने एकाएकी असे कृत्य केल्यानंतर पत्नीलाही सावरणं मुश्कील झालं.
उत्तर प्रदेशातील कोशंबी जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे अंधश्रद्धेचा किती कहर केला गेलाय, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.