नवी दिल्ली : देशाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जायचे म्हणजे स्वस्त आणि जलद साधन म्हणजे रेल्वे होय. वंदे भारत एक्सप्रेसमुळे (Vande Bharat Express) तुमचा प्रवासाचा कालावधी तर वाचणारच आहे. पण तुम्हाला थकवा ही जाणवणार नाही. वंदे भारत स्लीपर लवकरच प्रवाशांच्या दिमतीला हजर होत आहे. तुम्ही दूरचा प्रवास अगदी छान पैकी एक झोप काढून पूर्ण करु शकणार आहात. विशेष म्हणजे स्लीपर एक्सप्रेस आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असेल. त्यामुळे प्रवासाचा शीण येणार नाही. थकवा जाणवणार नाही. इतक्या किलोमीटर अंतरासाठी वंदे भारत स्लीपर (Vande Bharat Sleeper) धावणार आहे.
कधी सुरु होणार स्लीपर ट्रेन
मोदी सरकारने देशातील प्रवाशांना चांगल्या सुविधांसह कमी कालावधीत गंतव्य स्थानक जवळ करण्यासाठी वंदे भारत रेल्वे सुरु केली आहे. आता लांबपल्ल्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु करण्याची कवायत सुरु झाली आहे. पण या वर्षात ही भेट मिळणार नाही. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंबंधीची माहिती दिली. यावर्षी नाही तर पुढील वर्षी ही ट्रेन धावेल.
पुढील वर्षी या महिन्यात भेटीला
चेन्नई येथील द इंटिग्रल कोच फॅक्टरीत (ICF) वंदे भारत स्लीपरच्या डिझाईनचे काम सुरु असून डिसेंबर अखेरपर्यंत त्याला मूर्त रुप मिळेल. पुढील वर्षात मार्च 2024 मध्ये ही स्लीपर ट्रेन तयार होऊन कारखान्याबाहेर पडेल आणि त्यानंतर लागलीच अथवा एका महिन्यात प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येईल, अशी आशा आहे.
गेल्या महिन्यातच घोषणा
गेल्या महिन्यातच, केंद्रीय रेल्वे मंत्री वंदे भारत ट्रेनच्या तीन प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानुसार, वंदे चेअर कार, वंदे मेट्रो आणि वंदे स्लीपर्स पुढील वर्षात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील.
इतके अंतर कापणार
वंदे भारतचे तीन फॉर्मेट आहेत. 100 किलोमीटर पेक्षा कमी अंतरासाठी वंदे मेट्रो, 100-550 किलोमीटरसाठी वंदे चेअर कार आणि 550 किलोमीटर पेक्षा पुढील प्रवासासाठी वंदे स्लीपर ट्रेन असेल. पुढील वर्षात फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान या ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना मिळतील अधिक सुविधा
स्लीपर क्लास कोचमध्ये वंदे भारत प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळतील. या ट्रेनमध्ये वाय-फायची सुविधा मिळेल. एलडी स्क्रीन प्रवाशांना स्थानकासह इतर माहितीची अपडेट देत राहील. सुरक्षा, आरामदायक प्रवास यासाठी या ट्रेनमध्ये अनेक सुविधा असतील. या रेल्वेत ऑटोमॅटिक फायर सेंसर, GPS सिस्टम तसेच बेडही अत्यंत आरामदायक असतील. ही ट्रेन पूर्णपणे इकोफ्रेंडली असेल.
एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन
भारतीय रेल्वे एकाचवेळी 5 वंदे भारत ट्रेन सुरु करत आहे. हा कार्यक्रम येत्या 26 जून रोजी होत आहे. वंदे भारत आता मुंबई-गोवा, बंगळुरु-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदुर आणि भोपाळ-जबलपूर या मार्गावर धावेल. ऑगस्ट 2024 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन धावणार आहेत.