उमरिया, म. प्रदेश – आपल्या 15 महिन्यांच्या बाळाला वाघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी एका आईने थेट वाघाशी लढा (Mother fight with Tiger)दिल्याची घटना घडली आहे. एक-दोन मिनिटे नाही तर तिचा आणि वाघाचा हा लढा सुमारे 20 मिनिटे (20 minutes)सुरु होता. या लढाईत वाघाची नखे तिच्या फुफुसात घुसली. पण या आईने हिंमत हरली नाही. अखेरीस वाघाला या आईपुढे माघार घ्यावी लागली. आईने वाघाच्या जबड्यातून तिच्या बाळाची सुटका करण्यात यश मिळवले आहे. या लढाईनंतर या आईची परिस्थिती नाजूक आहे. सध्या तिच्यावर जबलपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात रोहनिया गावात हा प्रकार घडला आहे. बांधवगड (Bandhavgadh tiger reserve)टायगर रिझर्व्ह परिसरात हा प्रकार घडला.
मानपूरच्या बफर झोनला लागून असलेल्या ज्वालामुखी वस्तीतील अर्चना चौधरी रविवारी सकाळी 10 च्या सुमारास, 15 महिन्यांचे बाळ राजवीरला घेऊन जवळच्या झुडुपात शौचासाठी गेल्या होत्या. याचवेळीझुडुपांत लपून बसलेला वाघ, लाकडी काट्यांचे कुंपण ओलांडून आत आला आणि त्याने लहान बाळावर हल्ला केला. वाघाने या बाळाला त्याच्या जबड्यात पकडून ठेवले होते.
आपल्या बाळाला वाचवण्यासाठी आई अर्चना थेट वाघाला भिडली. यावेळी त्या दोघांमध्ये झालेल्या संघर्षात वाघाने तिच्या फुफुसात नखे खुपसली आहेत. सुमारे 20 मिनिटे या दोघांमध्ये हा संघर्ष सुरु होता. हा आवाज ऐकून वस्तीत राहणारे स्थानिक हातात लाठ्या-काठ्या घेऊन घटनास्थळी पोहचले. त्यानंतर वाघ त्या बाळाला सोडून जंगलात पळून गेला. त्यानंतर बाळावर आणि आईवर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन, त्यांची रवानगी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर, वाघाशी झालेल्या संघर्षात अर्चना यांची मान तुटली असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर अर्चना यांना जबरपूरला रेफर करण्यात आले आहे. सिव्हिल सर्जन डॉ. रुहेला यांनी सांगितले आहे की, या महिलेच्या पाठीवरही वाघाच्या नखांचे गंभीर घाव आहेत. टाके घातल्यानंतरही रक्त थांबत नाहीये. बाळाच्या डोक्यालाही दुखापत झाली होती, मात्र आता त्याची प्रकृती चांगली आहे. त्याचा धोका टळलेला आहे.
टायगर रिझर्वचे अधिकारी गावात सातत्याने अल्टर मोडवर तैनात करण्यात आले आहेत. स्थानिकांनी घरातच राहावे असे आदेश देण्यात आले आहेत. शेतांमध्ये लपून बसलेल्या वाघाला पुन्हा जंगलात पाठवण्यासाठी हत्तींची मदत घेण्यात येते आहे.
दुसऱ्या एका घटनेत, सिधी जिल्ह्यात डिसेंबरमध्ये संजय टायगर बफर झोनमध्ये बाडीझारीया गावात एक आई आपल्या मुलासाठी बिबट्याशी लढली होती. त्याही वेळी बिबट्याने माघार घेतलयाने बाळाचा जीव वाचला होता. बिबट्याने बाळाला उचलून नेल्यानंतर एक किलोमीटर त्याच्या पाठीमागे जाऊन बिबट्याशी या आईने संघर्ष केला होता. आदिवासी महिला किरण बैगा असे तिचे नाव होते. कोणत्याही हत्याराविना तिने हा संघर्ष केला होता.