कोलकाता- सेंट झेवियर्स विद्यापाठीतील एका महिला प्राध्यापिकेला (Ladies Professor) गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोकरी सोडावी लागली होती. कारण होते बिकिनीचे (Bikini). तिने घरात घातलेल्या बिकिनीचे फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram)टाकले होते. ते फोटो व्हायरल झाले, त्याच्यावर चर्चा झाली, त्यानंतर या प्राध्यापिकेला राजीनामा द्यावा लागला होता. आता हे प्रकरण कोर्टात गेल्याची माहिती स्थानिक न्यूज पोर्टलने दिली आहे. ही महिला प्राध्यापक घडलेल्या या प्रकाराबाबत कोलकता हायकोर्टात रिट याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे. विद्यापीठाने तिची बिनशर्त माफी मागावी आणि तिचे प्रतिमा हनन केले म्हणून तिला ९९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
या महिला प्राध्यापिकेने तिचे बिकिनीतील फोटो इन्सावर टाकल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या पालकांनी तिच्या या फोटोंची तक्रार विद्यापीठाकडे केली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये तिली कुलगुरुंच्या दालनात बोलावण्यात आले. तसेच त्यावेळी तिला राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यावेळी नेमकी काय तक्रार करण्यात आली होती, ते पत्रही तिला दाखवण्यात आले नसल्याचे या महिला प्राध्यापिकेचे म्हणणे आहे. जे वाचून दाखवण्यात आले तेवढेच आपण ऐकले, आणि त्यानंतर राजीनामा देण्यास सांगण्यात आले, अशी माहिती या महिला प्राध्यापिकेने दिली आहे.
या एकूण प्रकाराबाबत तिने जाडावपूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तसेच तिच्या इन्स्टा अकाऊंटचा एक्सेस तिच्या काही जवळच्यांनाच असताना, हे फोटो तिसऱ्या व्यक्तीकडे कसे गेले, याचा तपास करण्याची मागणी करण्याची दुसरी पोलीस तक्रारही या प्राध्यापिकेने नोंदवली होती. या प्रकरणात सेंट झेवियर्स विद्यापीठाचे कुलगुरु फादर फेलिक्स राज यांनी अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या प्रकरणाच्या निमित्ताने महत्तवाच्या प्रश्नाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या प्रतिमा आणि त्यात केलेले हावभाव हे या महिला प्राध्यापिकेच्या किंवा कुणाच्याही कर्तव्यावर किती परणाम करतात, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. असे होत नसेल तर सोशल मीडिया आणि कर्तव्याचा एकमेकांशी संबंध जोडण्याची गरज आहे का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतो आहे. बदलत्या काळात अनेक जण प्रवासात, पर्यटनात किंवा वैयक्तिक जगण्यात दिलाशासाठीही सोशल मीडियावरील पोस्ट टाकतात. त्यात अनेकदा त्यांच्या विषयांवरील भूमिका, फोटो ते टाकत असतात. त्यावरुन त्यांच्या कर्तव्यावर प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे का, की हा प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे, यावर चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचे मत यानिमित्ताने व्यक्त होते आहे.