नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : मी त्यांचा (मोदी) द्वेष करत नाही. ते माझे सासरे आहेत का? की त्यांचा आणि माझा मालमत्तेवरून वाद आहे? मी फक्त त्यांना इतकेच सांगतो की मी करदाता आहे. मी तुम्हाला तुमचा पगार दिला आणि तुम्ही मला तुमचा नोकर मानता. असे होत नाही. मी फक्त त्यांना त्यांचे काम करण्यास सांगत आहे. मी तेच बोलतो जे प्रत्येकाच्या मनात आहे. हा माझा आवाज नाही. तर हा आमचा (लोकांचा) आवाज आहे, अशी टीका प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी केली.
केरळ लिटररी फेस्टिव्हलमध्ये “स्टार पॉवर आणि स्टेट-क्राफ्ट: पब्लिक पर्सोना अँड इलेक्टोरल पॉलिटिक्स” या विषयावरील सत्रादरम्यान अभिनेता प्रकाश राज यांची मुलाखत घेण्यात आली. सूत्र संचालक अंजना शंकर यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांना पंतप्रधान मोदींचा द्वेष आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी प्रकाश राज बोलत होते.
आपल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल बोलताना प्रकाश राज म्हणाले, “ही माझी ‘मन की बात’ नाही तर आमची ‘मन की बात’ आहे.” सत्तेत असलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याची गरज आहे. मी त्यांना मत दिले किंवा नाही हा प्रश्न नाही. पण, ते आता माझे पंतप्रधान आहेत. ही लोकशाही आहे. ते असे म्हणू शकत नाही की तुम्ही मतदान केले नाही, तुम्ही प्रश्न विचारू नका. ज्या क्षणी ते पायउतार होतील आणि त्या जागी दुसरा कोणी येईल त्या व्यक्तीलाही मी हेच विचारेन. त्यावेळी माझ्या ट्विटमधला बदल तुम्हाला दिसेल. ते (मोदी) गेल्यानंतर मी त्यांच्याबद्दल का बोलू? असा सवालही त्यांनी केला.
नेहरू, हिटलर यांच्याबद्दलही मी ट्विट करतो. आठ पिढ्यांपूर्वीचे औरंगजेब, टिपू सुलतान यांच्याबद्दल जर मी बोललो तर लोक मला मूर्ख समजतील. कारण त्यावेळी माझा जन्म झाला नव्हता. पण, आताच्या परिस्थितीवर मात्र मी नक्कीच बोलू शकतो. आज राजकीय पक्षांनी आपला आवाज गमावला आहे. त्यांच्यात सत्य उरले नाही. म्हणूनच त्यांच्यापैकी अनेक (पक्ष) उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहेत. या देशात उमेदवार नाहीत? मतदारसंघांसाठी प्रतिनिधी शोधण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरू आहे. यावरुन आम्ही किती गरीब आहोत? हे दिसून येते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
अभिनेता प्रकाश राज यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बेंगळुरू सेंट्रलमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना यश आले नाही. आताही निवडणुका जवळ येत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘तीन राजकीय पक्ष’ मला आपला उमेदवार बनवण्यासाठी मागे लागले आहेत. पण, मी फोन बंद केला आहे. कारण मला या गोंधळात पडायचे नाही. ते लोकांसाठी किंवा माझ्या विचारसरणीसाठी सोबत येत नाहीत. तर, मी मोदींचा टीकाकार आहे. तुम्ही चांगले उमेदवार आहात, असे ते म्हणत असल्याचे प्रकाश राज यांनी सांगितले.