दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अटकेच्या भीतीने आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून अर्ज केला होता. पण त्याला हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यानंतर लगेचच ईडीचे पथक केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाला आप पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केजरीवाल यांची टीम आज रात्रीच तात्काळ सुनावणीसाठी आग्रही आहे. कारण केजरीवाल यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
ईडीचे काही अधिकारी सीएम केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. याआधी ईडीने केजरीवाल यांना 9 वेळा समन्स बजावले आहेत. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. आज 21 मार्च रोजी केजरीवाल यांना 10वे समन्स बजावण्यात आले आहे. अनेक एसीपी दर्जाचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. ईडीचे सहसंचालक केजरीवाल यांची चौकशी करत आहेत. पीएमएलएच्या कलम ५० अंतर्गत ही चौकशी होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ईडीचे पथक गेल्या गेल्या एक तासापासून केजरीवाल यांच्या घरी आहे.
दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्या घरी कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये. त्यांना आजच अटक केली जाऊ शकते. ईडीच्या कारवाईवरून असे दिसते की मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की. भाजपची राजकीय टीम मुख्यमंत्री केजरीवाल यांची विचारसरणी पकडू शकत नाही. कारण भाजपला फक्त आपच रोखू शकते.
पीएम मोदी हे केजरीवाल यांना घाबरतात. कारण देशात मोदींना केजरीवाल हा एकमेव पर्याय आहे. असे आपने म्हटले आहे.
आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने धक्का दिला होता. अटकेपासून सुटका नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. ईडीने अनेक समन्स देऊनही केजरीवाल चौकशीसाठी येत नव्हते. समन्सला उत्तर देण्यासाठी केजरीवाल यांना ईडीसमोर हजर राहावे लागेल, त्यांच्या अटकेवर कोणतीही स्थगिती नाही. असे कोर्टाने म्हटले होते.