नवी दिल्ली: भारतातील अविवाहित महिलांना आता एमटीपी ॲक्ट (MTP)म्हणजेच मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नंसी (Medical Termination of Pregnancy) ॲक्टनुसार गर्भपात करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारी , 29 सप्टेंबर रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या ॲक्टनुसार, अविवाहित महिलांना गर्भपाताच्या अधिकारापासून वंचित ठेवणं असंवैधानिक असल्याचे कोर्टाने नमूद केले. कोर्टाच्या या निर्णयानंतर आता अविवाहित महिलांना 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येणार आहे. इंडिया टुडेच्या डेटा इंटेलिजन्स युनिटने भारतातील गर्भपाताची माहिती आणि ट्रेंडचे विश्लेषण केले असून त्यामधून बरीच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 च्या (National Family Health Survey-5) आकड्यांनुसार भारतात जितक्या महिलांनी (आतापर्यंत) गर्भपात केला, त्यापैकी निम्मे गर्भपात हे केवळ नको असलेली गर्भधारणा झाल्यामुळेच करण्यात आले आहेत. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 च्या आकडेवारीतून गर्भपाताशी संबंधित अनेक सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक कारणांचा खुलासा झाला आहे.
महिलांशी संबंधित (15 -49 वयोगट) असलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 मधील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, भारतात गर्भपाताचे सर्वात मोठे कारण नको असलेली/अनियोजित गर्भधारणा हे आहे. या आकडेवारीनुसार, 47.6 टक्के गर्भपात हे अनियोजित (प्रेग्नन्सी) असल्यामुळे होतात.
11.03 टक्के गर्भपात हे आरोग्याशी संबंधित कारणांमुळे होतात. 9.7 टक्के गर्भपात हे शेवटचे मूल अगदी लहान असल्यामुळे तर 9.1टक्के गर्भपात इतर गुंतागुंतीमुळे होतात. 4.1 टक्के गर्भपात हे पती किंवा सासूच्या अनिच्छेमुळे होतात.
भारतात 3.4 गर्भपात हे आर्थित कारणांमुळे होतात. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आर्थिक कारणांमुळे गर्भपात सर्वाधिक होतात. गर्भातील बाळ हे मुलगी आहे, या कारणामुळे 2.1 टक्के गर्भपात होतात.
भारतात गर्भातील बाळाचे लिंग जाणून घेणे (मुलगा आहे की मुलगी) हा कायदेशीर गुन्हा असतानाही देशात ही परिस्थिती आहे. तर 12.7 टक्के गर्भपात हे इतर कारणांमुळे होतात.
भारतात गर्भपाताबाबत मेडिकल स्टॅंडर्ड आणि सुरक्षिततेचा अभाव दिसून येतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 च्या आकडेवारीनुसार देशात दरवर्षी होणाऱ्या गर्भपातांपैकी 27 टक्के गर्भपात हे घरी होतात.
म्हणजेच गर्भपातासाठी तरूणी / महिला या रुग्णालयात जात नाहीत, उलट ही वैद्यकीय प्रक्रिया घरीच करतात. शहरांमध्ये 21.6 टक्के गर्भपात महिला स्वत: करतात, तर ग्रामीण भागातील महिलांचा हा आकडा 30 टक्के इतका आहे.
मात्र भारतातील निम्म्याहून अधिक, अंदाजे 54.8 टक्के महिला गर्भपातासाठी डॉक्टरांकडे जातात. देशात 3.5 टक्के गर्भपात हे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या मदतीने केले जातात.
संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2022 नुसार, असुरक्षित गर्भपाताशी संबंधित कारणांमुळे भारतात दररोज सुमारे ८ महिला मृत्यूमुखी पडतात. त्याशिवाय असुरक्षित गर्भपात हे भारतातील मातामृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. या रिपोर्टनुसार, 2007 ते 2011 या कालावधीदरम्यान भारतातील 67 टक्के गर्भपात हे असुरक्षित होते.
राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या राज्यांपेक्षा दिल्लीत गर्भपाताचा पर्याय निवडणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक आहे. राजधानी दिल्लीत 5.7 टक्के गर्भवती महिला या गर्भपाताचा पर्याय निवडतात.
राजस्थानमध्ये हे प्रमाण 1.5 टक्के तर मध्य प्रदेशमध्ये हा आकडा 1.3 टक्के इतका आहे. देशातील 19 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गर्भपाताचा पर्याय निवडणाऱ्या महिलांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरी 2.9 पेक्षा जास्त आहे.