बैतूल: आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे. बस आणि टवेरा कारचा भीषण अपघात (Car Bus Accident) झाला आहे. मजुरांना घेऊन जाणारा टवेरा कारचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री दोन वाजताची ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे. कार चालकाला डुलकी लागल्याने कार थेट बसला जाऊन धडकली. या भीषण अपघातात 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे. अपघात मृत्यूमुखी पडलेले सर्व मजूर मध्यप्रदेशातील (Accident in MP) आहेत. ते महाराष्ट्रातील अमरावतीत मजुरीसाठी आले होते. मजुरीचं काम संपल्यानंतर तब्बल 20 दिवसाने गावाकडे जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. या अपघाताची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी शोक व्यक्त केला आहे.
मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील परतवाडा मार्गावरील झल्लार गावात रात्री 2 वाजता हा अपघात झाला. झल्लार गावाहून रिकामी बस निघाली होती. तितक्यात टवेरा कारच्या चालकाला डुलकी लागल्याने ही कार अनियंत्रित झाली. अन् कार थेट बसला जाऊन धडकली. त्यामुळे समोरासमोर धडक झाल्याने अपघातात 11 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये 5 पुरूष, 4 महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही कार मजुरांनी खच्चून भरलेली होती. अमरावतीच्या कळंबा येथे हे मजूर मजुरीसाठी आले होते. मजुरीचं काम आटोपल्यानंतर 20 दिवसानंतर ते आपल्या गावी निघाले होते. हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील मेंढा, चिखलार आणि महतगाव येथील रहिवासी आहेत.
हा अपघात अत्यंत भयंकर होता. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्यानंतर कारमध्ये काही मृतदेह अडकून पडले होते. त्यामुळे कारचा काही भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या अपघातात कारचा चक्काचूर झालाच. पण बसचा समोरचा भागही चक्काचूर झाला. या अपघातात चालक यशवंत परते गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, बैतूलचे जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे.
या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदतनिधीतून प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याचीही घोषमा करण्यात आली आहे.
या शिवाय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना प्रत्येकी 10 हजारांचं अर्थ सहाय्य करण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
मृतांची नावे
लक्ष्मण सुखराम भुसकर (वय 30), किशन लिलाजी मावस्कर (वय 32), कुसूम किशन मावस्कर (वय 28), अनारकली केजा मावस्कर (वय 35), संध्या केजा (वय 5), अभिराज केजा वय दीड वर्ष, अमर साहेबलाल धुर्वे (वय 35), मंगल नन्हेसिंह उईके (वय 37), नंदकिशोर धुर्वे (वय 48), श्यामराव रामराव झरबडे (वय 40) आणि रामकली श्यामराव (वय 35).