अयोध्या | 11 सप्टेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या जळगावातील भाषणाचे थेट अयोध्येत पडसाद उमटले आहेत. अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर हिंदू भाविक परतताना एखाद्या शहरात, वस्तीत गोध्रा घडवलं जाईल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. ठाकरे यांच्या या दाव्याचा अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने समाचार घेतला आहे. अयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. इथे कोणी काहीच करू शकणार नाही, असं या पुजाऱ्याने म्हटलं आहे.
राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी टीव्ही9 भारतवर्षशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली. अयोध्येत प्रचंड सुरक्षा व्यवस्था आहे. इथे पान सुद्धा हलवू शकणार नाही. सतपाल मलिक, प्रशांत भूषण आणि उद्धव ठाकरे हे तिघेही घाबरवण्याचे काम करत आहेत. तिघांनीही अशाच प्रकारची विधाने केली आहे. तिघांनीही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दंगली घडवून आणणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं हे विधान चुकीचं आहे. इथे कुणी केसही वाकडा करू शकत नाही. साधं पानही कुणी हलवू शकणार नाही. या ठिकाणी प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे या तिघांच्याही म्हणण्यात काहीही तथ्य नाही, असं आचार्य सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे.
यावेळी आचार्य सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरे, प्रशांत भूषण आणि सतपाल मलिक या तिघांवरच उलटा आरोप केला आहे. हे तिघेच दंगे भडकवतील की काय अशी भीती आम्हाला आहे, असं सत्येंद्र दास म्हणाले. सर्व तयारी झाली आहे. राम लल्ला स्थानापन्न होतील. सर्व काही शांततेत पार पडेल. संपूर्ण कार्यक्रम 22 जानेवारी रोजी होणार आहे.
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील. सर्व लोक उत्साहीत आहेत. सर्व काही चांगलं होईल. कुणी कितीही भडकवलं तरी त्याचा भक्तांवर काही परिणाम होणार नाही. कुणी कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी तसं काही होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे काल जळगावात होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा गोध्रा होण्याची भीती व्यक्त केली. राम मंदिराच्या उद्घटानाला देशभरातून हिंदूंना बोलावलं जाईल. रेल्वे, ट्रक, बसने भाविकांना अयोध्येत बोलावलं जाईल. सोहळ्यातून परतताना एखादं शहर किंवा वस्तीत गोध्रा घडवलं जाईल. बस जाळल्या जातील. राडा भडकवला जाईल. घरे पेटवली जातील आणि पेटलेल्या घरांवर हे लोक राजकीय पोळी भाजून घेतील, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर अयोध्येतील मुख्य पुजाऱ्याने प्रत्युत्तर दिलं आहे.