Loksabha Election 2024 | काँग्रेसची आणखी एक विकेट पडणार का?. नुकताच महाराष्ट्रात काँग्रेसला दणका बसला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाची वाट धरली. भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. आता अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एका राज्यात धक्का बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांपेक्षाही काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. कारण हा नेता गेल्या अनेक वर्षांपासून या राज्यात लढतोय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. पण आता तृणमुल आणि काँग्रेसमध्ये डील होण्याची शक्यता दिसतेय. ही डील झाल्यास पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी पक्षाची साथ सोडू शकतात.
अधीर रंजन चौधरी यांची नाराजी ममता सरकारसाठी नवीन नाहीय. पश्चिम बंगालच्या प्रत्येक समस्येवर ते ममता बॅनर्जी यांना घेरतात. अशावेळी टीएमसी आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा करार झाल्यास अधीर रंजन चौधरी पक्ष सोडणार का? काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते नाराज असल्याच काहींनी मान्य केलय. पण हायकमांड त्यांची समजूत काढेल असही काही नेत्यांच मत आहे.
त्यांना काय टाळायच आहे?
अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातल एक मोठ नाव आहे. आज नाही, मागच्या अनेक वर्षांपासून ते विरोधी पक्षनेते म्हणून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींशी लढतायत. लोकसभेसाठी बोलणी यशस्वी झाल्यास त्यांना टीएमसी नेत्यांसोबत मंचावर याव लागेल. ममता सरकारबद्दल आपली भूमिका सौम्य करावी लागेल. अधीर रंजन चौधरी यांना हे टाळायच आहे.
आघाडीला विरोध का?
तृणमुलशी आघाडी झाल्यास काँग्रेसला कमी जागा मिळणार हे अधीर रंजन चौधरी यांना माहित आहे. त्यामुळे अशी आघाडी त्यांना मान्य नाहीय. अधीर रंजन चौधरी यांच्या बेरहामपुरच्या जागेवरुनही दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत.
2019 मध्ये काँग्रेसला फक्त किती टक्के मत मिळाली?
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमुलने 42 पैकी 22 आणि भाजपाने 18 जागांवर विजय मिळवला होता. डाव्या पक्षांना एका जागेवर विजय मिळाला होता. टीएमसीला त्या निवडणुकीत 44 टक्के मते मिळाली होती. भाजपाला 41 टक्के मत मिळाली होती. काँग्रेस पक्षाला 2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये 6 टक्के मत मिळाली होती.