Aditya L-1 | यशस्वी चांद्रयान 3 मोहिमेनंतर भारत आज सूर्यावर झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताने सूर्याच्या दिशेने पाठवलेलं पहिल सूर्ययान आज 6 जानेवारीला सूर्य नमस्कार करेल. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोची ही महत्त्वकांक्षी मोहिम आहे. Aditya L-1 द्वारे सूर्याचा अभ्यास करण्यात येईल. एकप्रकारे भारताची ही सूर्याच्या जवळ असलेली वेधशाळा असणार आहे. ISRO ने पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर ‘आदित्य एल1’ ला सूर्याच्या कक्षेत स्थापित करण्याची तयारी केली आहे.
इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य एल-1ला पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये जो लॅग्रेज (L1) पॉइंट आहे, त्या हॅलो कक्षेत स्थापन करण्यात येईल. लॅग्रेज (L1) पॉइंटवर पृथ्वी आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण निष्क्रिय होतं. L1 पॉइंटवरुन सूर्यावर सतत नजर ठेवली जाईल. या यानामुळे सूर्याजवळ घडणाऱ्या घडामोडी आणि अवकाश हवामानावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करता येईल.
400 कोटीच्या मिशनमुळे 50 हजार कोटी कसे वाचणार?
आदित्य-एल1 मिशनच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “या मिशनद्वारे फक्त सूर्याचाच अभ्यास करता येणार नाही, तर 400 कोटीच्या या प्रोजेक्टमधून सूर्यावर येणाऱ्या वादळांची माहिती मिळेल. त्यामुळे भारताचे 50 हजार कोटींचे अनेक उपग्रह सुरक्षित ठेवता येतील. एकप्रकारे ही देशाची मदतच आहे. हा प्रोजेक्ट देशासाठी खूप महत्त्वाचा आहे”
मिशनचा उद्देश काय?
इस्रोच्या पीएसएलवी-सी57 रॉकेटने 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य-एल1 च यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. आदित्य एल 1 वेगवेगळ्या टप्प्यांमधून पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर गेलं. फक्त सूर्याचा अभ्यास आणि प्रत्येक छोट्यात छोट्या घडामोडीची माहिती देण्यासाठी ‘आदित्य एल1’ हेच या मिशनच उद्देश आहे. सौर वातावरण, सूर्याची ऊर्जा, सूर्याचा पृष्ठभाग, सूर्यावर येणारे भूकंप हे उद्देश या मिशनमधून साध्य करण्यात येतील.
आदित्य एल1 मध्ये किती उपकरण?
आदित्य एल1 मध्ये सात साइंटिफिक पेलोड आहेत. हे सर्व पेलोड इस्रो आणि राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळेने विकसित केले आहेत. या पेलोडसना विद्युत चुंबकीय कण आणि चुंबकीय क्षेत्र डिटेक्टर्सचा उपयोग करुन प्रकाश मंडल, क्रोमोस्फीयर आणि सूर्याचा बाहेरील भाग कोरोनाचा निरीक्षण करण्यासाठी बनवण्यात आलं आहे.