नवी दिल्ली, दि. 7 जानेवारी 2024 | भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या पहिल्या सौर मिशनची चर्चा जगभरात होत आहे. आदित्य-एल1 शनिवारी लँग्रांज बिंदूवर जाऊन पोहचला आहे. आदित्य एल वनने पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटरचे आंतर पार करत ‘सूर्य नमस्कार’ केला. या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व इस्त्रोने निगार शाजी हिच्याकडे दिले होते. प्रोजेक्ट डायरेक्टर असलेली निगार शाजी हिची चर्चा यामुळे जगभरात सुरु आहे. सामान्य शेतकऱ्याची मुलगी आणि सरकारी शाळेत शिक्षण घेतलेली निगार या मोहिमेसाठी आपल्या टीमसोबत आठ वर्षांपासून परिश्रम करत आहे.
नेहमी हसतमुख राहणारी निगार शाजी सौम्य स्वभावाची आहे. 1987 मध्ये त्या भारतीय अंतराळ संस्थेत दाखल झाल्या. 59 वर्षीय शाजी यापूर्वी रिसोर्ससैट-2ए चे सहायक संचालक होती. त्या लोअर ऑर्बिट आणि प्लेनेटरी मिशनच्या प्रोजेक्ट डायरक्टर होत्या. इस्त्रोमध्ये त्यांनी श्रीहरिकोटा अंतरिक्ष बंदर या मोहिमेवर काम केले. त्यानंतर बंगळुरुमधील के यू आर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये दाखल झाल्या.
निगार यांचा जन्म एका मुस्लिम परिवारात झाला. तामिलनाडूमधील तेनकासी जिल्ह्यातील सेनगोट्टई येथील त्या रहिवाशी आहेत. शाजी यांनी सेनगोट्टई येथील सरकारी शाळेत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मदुरै कामराज विद्यापीठात सरकारी इंजिनियरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरींग केले. मास्टर पदवीसाठी बिर्ला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये शिक्षण घेतले.
निगार हिचे वडील गणित विषयात पदवीधर आहे. परंतु त्यांनी शेतीच करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी निगारला नेहमी मोठे काही करण्यासाठी प्रेरीत केले. एका मुलाखतीत निगार यांनी आई-बाबांनी नेहमीच आपणास सहकार्य आणि प्रोत्साहान दिल्याचे सांगितले. त्यांच्या पाठिंब्यामुळे आपण हा टप्पा गाठू शकलो. इस्त्रोमध्ये कधी लैगिंक भेदभाव झाला नाही. एक मुलगी म्हणून वेगळी वागणूक मिळाली नाही. वरिष्ठांकडून नेहमी सहकार्य मिळत राहिले. निगार आपल्या आई-वडिलांसोबत बंगळुरुमध्ये राहतात तर त्याचे पती आणि मुलगा विदेशात कार्यरत आहे.