G-20 Summit 2023, 9 सप्टेंबर 2023 : G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी पहिले सत्र सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी सर्वप्रथम मोरोक्कोच्या भूकंपाबद्दल सहानुभुती व्यक्त केली. जिथे सुमारे 300 लोक मरण पावले आहेत. या दु:खाच्या काळात संपूर्ण जग मोरोक्कोसोबत असल्याचे त्यांनी म्हटले. आफ्रिकन युनियनचा G20 गटात अधिकृतपणे सामील केल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांनीही युनियन अध्यक्षांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली की, तुमच्या सर्वांच्या संमतीने आफ्रिकन युनियन आजपासून G20 चा स्थायी सदस्य होणार आहे. या घोषणेने सर्व नेत्यांनी टाळ्या वाजवल्या. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष अझाली असुमानी यांना सोबत आणले आणि पंतप्रधान मोदींनी त्यांना मिठी मारली आणि याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदींनंतर सर्व जागतिक नेते एक एक करून आपली मते मांडतील. मोरोक्कोच्या भूकंपावर पंतप्रधान म्हणाले की G20 ची कार्यवाही सुरू करण्यापूर्वी, मी मोरोक्कोमधील भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त करू इच्छितो. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, G20 चे अध्यक्ष या नात्याने भारत संपूर्ण जगाला एकत्रितपणे जागतिक विश्वासाची कमतरता एका विश्वासात बदलण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयत्न हा मंत्र आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक प्रकाश बनू शकतो.
जागतिक अर्थव्यवस्था आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील गोंधळ असो, उत्तर-दक्षिण विभागणी असो, पूर्व-पश्चिम विभागणी असो, दहशतवाद आणि सायबर सुरक्षा, आरोग्य, ऊर्जा आणि जलसुरक्षा असो… येणाऱ्या काळात या आव्हानांना ठोस उपायांसह सामोरे जावे लागेल, असे पंतप्रधान म्हणाले.