INDIA Alliance : लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला तीन मोठे झटके लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिला होता. आपण भाजपचा पराभव करण्यासाठी काफी आहोत असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. भगवंत मान यांनी इंडिया आघाडीला दुसरा धक्का दिला होता. त्यानंतर बिहारमध्ये इंडिया आघाडीचा खेळ मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिघडवला होता. त्यांना राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. JDU अध्यक्ष नितीश कुमार आता NDA सोबत आले आहेत. पण या तीन राज्यांमध्ये आणखी दोन राज्यात इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे.
आसाम आणि जम्मू-काश्मीर या दोन राज्यांमध्ये भाजपने इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. आसाममध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली. आसाममध्ये रविवारी काँग्रेसला मोठा धक्का बसला जेव्हा पक्षाचे सुमारे 150 नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसशिवाय ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (AASU) च्या कार्यकर्त्यांनीही भाजपचे सदस्यत्व घेतले.
माजी विधानसभा अध्यक्ष जीबा कांता गोगोई यांची सून आणि माजी मंत्री बिस्मिता गोगोई, आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अंजन दत्ता यांची मुलगी अंकिता दत्ता आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचे माजी अध्यक्ष दिपंका कुमार नाथ यांचा भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष भाबेश कलिता, मंत्री पियुष हजारिका आणि जयंत मल्ला बरुआ यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षाचे सदस्यत्व घेतले.
इंडिया आघाडीला जम्मू आणि काश्मीरमध्ये ही धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या पक्ष नॅशनल कॉन्फरन्सच्या अनेक प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नॅशनल कॉन्फरन्स सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांमध्ये कठुआ (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष संजीव खजुरिया यांच्या नावाचाही समावेश आहे. संजीव खजुरिया म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत मिळत आहे आणि त्यामुळेच ते आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत भाजपचे सदस्यत्व घेत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या या सर्व नेत्यांना जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना यांनी पक्षाचे सदस्यत्व दिले.