बंगळुरु : ब्रिक्स परिषद त्यानंतर ग्रीस दौरा आटोपून भारतात दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयात आले. इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी त्यांना चांद्रयान-3 मिशनबद्दल समजावून सांगितलं. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी शास्त्रज्ञांना संबोधित करत आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा विक्रम लँडर जिथे उतरला, त्या जागेला ‘शिवशक्ती’ पॉइंट असं नाव दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. ‘शिव’ मध्ये मानव कल्याण सामावलेलं आहे. ‘शक्ती’मध्ये संकल्प पूर्ण करण्याच सामर्थ्य आहे. त्यामुळे विक्रम लँडर जिथे उतरला त्या जागेला ‘शिवशक्ती पॉइंट’ नाव दिल्याच मोदींनी जाहीर केलं.
चांद्रयान-2 चंद्रावर ज्या ठिकाणी पोहोचलं, ती जागा यापुढे तिरंगा पॉइंट म्हणून ओखळली जाणार आहे. त्याचवेळी यापुढे दरवर्षी 23 ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून ओळखला जाईल. याच दिवशी भारताच्या चांद्रयान 3 ने यशस्वीरित्य चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं.
वैज्ञानिक सामर्थ्याचा हा शंखनाद
“मी भारतात येताच लवकरात लवकर तुमच दर्शन करायच होत. तुम्हा सगळ्यांना सलाम करायचा होता. सॅल्युट तुमच्या परिश्रमाला, सॅल्युट तुमच्या हिमतीला, तुमच्या जिद्दीला सलाम, तुम्ही देशाला ज्या उंचाीवर घेऊन गेलात हे साधारण यश नाहीय. अवकाशात भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याचा हा शंखनाद आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘हा निर्भीड, झुंझार भारत’
“आपण तिथे पोहोचलो, जिथे कोणी पोहोचलं नव्हतं. आपण ते केलं जे याआधी कोणी केलं नव्हतं. हा आजचा भारत आहे. निर्भीड, झुंझार भारत आहे. हा तो भारत जो नवीन विचार करतो, नव्या पद्धतीने विचार करतो. डार्क झोनमध्ये जाऊन प्रकाशाचा किरण पसरवतो. 21 व्या शतकात हाच भारत जगातील मोठ्या समस्यांच समाधान करेल” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
मोदी भाषणाच्या सुरुवातीला भावनिक
“माझ्या डोळ्यासमोर 23 ऑगस्टचा तो दिवस, प्रत्येक सेकंद सतत येतोय. ज्यावेळी चंद्रावर टचडाऊन झालं, त्यावेळी इस्रो सेंटर, संपूर्ण देशात लोकांना जो आनंद झाला, ते दृश्य कोण विसरेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी भाषणाच्या सुरुवातीला भावनिक झाले होते.
‘काही क्षण अमर झाले’
“काही स्मृती अमर असतात, काही क्षण अमर झाले. तो प्रेरणादायी क्षण होते. प्रत्येक भारतीयाला वाटत होतं, तो विजय आपल्या स्वत:हाचा आहे. प्रत्येक देशवासियाला वाटत होतं की, आपण मोठ्या परीक्षेत पास झालोय” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “आज शुभेच्छा दिल्या जात आहेत. संदेश दिला जातोय हे सगळ शक्य झालय, ते इस्रोच्या वैज्ञानिकांमुळे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
विक्रमचा विश्वास, प्रज्ञानचा पराक्रम
“मी तुम्हा सगळ्यांच कौतुक करीन तेवढं कमी आहे. मी तो फोटो बघितला ज्यात मून लँडरने चंद्रावर मजबुतीने पाय रोवले आहेत. एकप्रकारे विक्रमचा विश्वास आहे, दुसऱ्याबाजूला प्रज्ञानचा पराक्रम आहे. प्रज्ञान चंद्रावर पदचिन्ह उमटवतोय, वेगवेगळ्या कॅमेऱ्यामधून रिलीज झालेले फोटो बघितले हे अद्भभूत आहे” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.