नवी दिल्ली: गेल्यावर्षी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय जवानांशी झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर चीनला एक धडा मिळाला. आपले सैनिक हे पुरेसे सक्षम नाहीत, त्यांना आणखी प्रशिक्षण देण्याची गरज आहे, या गोष्टीची चीनला (Chines Army) उपरती झाली, असे वक्तव्य CDS बिपीन रावत यांनी केले. (Chinese Army realised it needs to be better trained CDS Rawat)
‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी गेल्यावर्षी 15 जूनला गलवान खोऱ्यात भारत आण चिनी सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावर भाष्य केले. चिनी सैनिकांना फार थोड्या कालावधीसाठी लडाखच्या प्रदेशात तैनात केले जाते. तसेच हिमालयासारख्या पर्वतरागांमध्ये लढाई कशी करायची याचा त्यांना फारसा अनुभव नाही. गलवान खोऱ्यातील भारतीय सैनिकांशी झालेल्या झटापटीवेळी ही बाब उघड झाली. तेव्हापासून लडाख प्रदेशातील चिनी लष्कराच्या सैन्य तैनातीमध्ये अनेक बदल दिसून आल्याचे CDS बिपीन रावत यांनी सांगितले.
गेल्यावर्षी मे आणि जून महिन्यात लडाख परिसरात भारतीय आणि चिनी सैनिक अनेकदा आमनेसामने आले. तेव्हा चीनला आपल्या मर्यादांची जाणीव झाली. आपल्या सैनिकांना अधिक तयारीची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले, असे रावत यांनी म्हटले.
चिनी लष्करातील बहुसंख्य सैनिक हे शहरी भागातील आहेत. सीमाभागात कमी कालावधीसाठी त्यांना तैनात केले जाते. लडाखसारख्या पर्वतीय भागात लढण्याचा त्यांचा अनुभव अत्यंत कमी आहे. याउलट भारतीय सैनिक हे अशा परिस्थितीत लढण्यासाठी अधिक सक्षम आणि युद्धकौशल्यात निपूण आहेत. चिनी सैनिकांच्याबाबतीत हे चित्र पूर्णपणे उलटे आहे.
तिबेटच्या पर्वतीय भागांमधील वातावरण आणि परिस्थिती खडतर असते. हा पर्वतीय प्रदेश आहे. या भागात लढण्यासाठी तुम्हाला विशेष प्रशिक्षणाची गरज असते. भारतीय सैनिकांनी बराच काळ पर्वतीय प्रदेशात लढण्याचे प्रशिक्षण घेतल्याने ते अधिक उजवे ठरतात. याशिवाय, भारतीय सैनिक सातत्याने पर्वतीय प्रदेशात वावरत असतात, असेही CDS बिपीन रावत यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
Galwan Clash : गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याला डोळे दाखवणाऱ्या चिनी सैनिकालाही कंठस्नान
(Chinese Army realised it needs to be better trained CDS Rawat)