मुंबई : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आणि भारत-कॅनडा यांच्यातील संबंधाला तडा गेला. भारताने यावर कडक शब्दात कॅनडाच्या पंतप्रधानांना उत्तर दिले. कॅनडाच्या तपास यंत्रणा या हत्येमध्ये भारतीय सरकारी दलालांचा सहभाग असल्याच्या संभाव्य पुराव्यावर काम करत आहेत. असे वक्तव्य त्यांनी केले होते. तर हा दावा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं भारत सरकारने म्हटलं होतं. भारताने खलिस्तानी समर्थकांना आश्रय देणाऱ्या कॅनडाला अनेकदा कारवाईचे आवाहन केले होते. पण कॅनडाने कधीही कोणतीही कारवाई केली नाही.
जस्टिन ट्रुडो यांच्या या दाव्यानंतर कॅनडाने एका भारतीय राजनैतिकाला देशातून बाहेर पाठवले. भारतानेही मग यावर कठोर भूमिका घेत कॅनडाच्या एका मुत्सद्द्याला देश सोडण्यास सांगितले. भारताने कॅनडाच्या नागरिकांचा व्हिसा बंद केला. आता भारत सरकारने कॅनडाला आपल्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. भारताच्या या कठोर भूमिकेमुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना शहाणपण सुचलं आहे.
जस्टिन ट्रुडो यांनी मंगळवारी म्हटले की, कॅनडा भारतासोबत “अत्यंत आव्हानात्मक काळा”मधून जात आहे. कॅनडासाठी भारतात मुत्सद्दी असणे महत्त्वाचे आहे. आम्ही पुढे जाण्याचा विचार करत नाही, तर या कठीण काळात भारतासोबत विधायक संबंध ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करणार आहोत.
भारताने कॅनडाला आपले ४१ राजनैतिक अधिकारी परत बोलावण्यास सांगितल्यानंतर, कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली म्हणाल्या की, राजनैतिक संकट सोडवण्यासाठी आपला देश नवी दिल्लीशी वैयक्तिक चर्चा करू इच्छितो. आम्ही भारत सरकारच्या संपर्कात आहोत. आम्ही कॅनडाच्या मुत्सद्दींच्या सुरक्षेला अतिशय गांभीर्याने घेतो. आमचा विश्वास आहे की राजनयिक संभाषणे खाजगी राहिल्यावर उत्तम काम करतात.”
भारताने कॅनडाला 10 ऑक्टोबरपर्यंत सुमारे 40 राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. या मुदतीनंतरही कॅनडाने आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावले नाही तर भारत सरकार त्यांची सुरक्षा काढून घेईल. अशी रोखठोक भूमिका भारताने घेतली आहे. कॅनडाचे भारतात जास्त मुत्सद्दी आहेत. ही तफावत दूर करण्याचे आवाहन भारताने केले आहे.
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया राज्यातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंह निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला आहे. भारताने हे आरोप निरर्थक आणि प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध अत्यंत बिकट बनले आहेत.