नवी दिल्ली : कोरोनानंतर आता चीनमध्ये आता एक नवा आजार थैमान घालत आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लोकं न्यूमोनियासारख्या आजाराने ग्रस्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. या नवीन आजाराचा कोरोनाशी काही संबंध याबाबत कोणताही खुलासा अजून झालेला नाही. चीनमध्ये हा आजार पसरल्यानंतर भारत सरकारही अलर्ट आहे. कारण कोरोनाने देखील अशाच प्रकारे पाय पसरले होते. चीनवर कोणत्याही देशाचा विश्वास नाही. चीन खरी माहिती देईल का याबाबत देखील शंका व्यक्त केली जाते. त्यामुळे या आजाराचे प्रमाण किती आहे हे अजूनही सांगता येणार नाही. चीनने कोरोनाबाबत ही अशीच माहिती लपवली होती.
H3N2, H1N1 आणि H9N2 याबाबत नमुने तपासले जात आहेत. भारतात अशी काही प्रकरणे आढळून येत आहेत का याबाबत ही लक्ष ठेवले जात आहे. उत्तर चीनमध्ये मुलांमध्ये श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगून श्वसन रोगांचा सामना करण्यासाठी प्रारंभिक उपायांचे सक्रियपणे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याचा इन्फ्लूएन्झा आणि थंडीचा हंगाम पाहता हे महत्त्वाचे मानले जात आहे, त्यामुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत.
भारत सरकार यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिवांनी सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाची तयारी सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. इन्फ्लूएंझासाठी बेड, औषधे आणि लसींची उपलब्धता, वैद्यकीय ऑक्सिजन, प्रतिजैविक, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे, चाचणी किट, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कार्यक्षमता याबाबत माहिती घेण्यात आली.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलीकडेच चीनच्या उत्तरेकडील भागात श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे संकेत दिले आहेत. इन्फ्लूएंझा, न्यूमोनिया आणि SARS-CoV-2 यांसारख्या आजारांसाठी हे प्रामुख्याने जबाबदार आहे.