डिंडोरी- पती-पत्नीचे नाते तसे विलक्षण प्रेमाचे नाते असते. अशाच एका पत्नीवर प्रेम करणाऱ्या पतीची ही कहाणी आहे. हा पती व्यवसायाने शिक्षक (Teacher Husband)होता. त्याचे आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेम होते. पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर मोठाच अघात झाला. तिच्यापासून वेगळा होण्यासाठी तो तयारच नव्हता. तिला लांब कुठेतरी नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार करणेही त्याला मान्य नव्हते. अखेरीस नातेवाईक आणि शेजारच्यांनी केलेल्या विरोधानंतरही त्याने आपल्या पत्नीला आपल्या घरातच दफन (buried in home) करण्याचा निर्णय घेतला. ओंकारदास मोगरे असे या शिक्षकाचे नाव. मध्यप्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात हा सगळा प्रकार घडला. ओंकारदासने त्याची पत्नी रुक्मिणी हिच्या कबरीचे रुपांतर एका मंदिरात केले. त्या कबरीला त्याने फुलांनी सजवले. तसेच झोपेच्या वेळी तो या कबरीजवळच झोपी (slept near grave)गेला. २५ वर्ष एकत्र राहिलेल्या पत्नीला एकटं सोडण्याची त्याची तयारी नसल्याचेच यातून स्पष्ट होत होतं.
हे त्याचं उत्कट प्रेम एकीकडे असताना, दुसरीकडे या सगळ्या प्रकाराने शेजारी मात्र घाबरुन गेले. त्यांच्यादृष्टीने शिक्षक असलेला ओंकारदास करत होता तो वेडेपणाच होता. त्यांनी या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी हा मृतदेह घरातून काढून योग्य ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले.
डिंडोरीच्या बिरसा मुंडा स्टेडियमजवळ असलेल्या शिक्षक ओंकारदासच्या घरात पत्नी रुक्मिणीचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य गेल्या दहा वर्षांपासून सीकल सेल एनिमिया या आजाराशी झुंज देत होते. या दाम्पत्याला मूलबाळही नाही. रुक्मिणीच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेल्या ओंकारदासने, अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना रुक्मिणीचे दफन घरातच करण्याचा आग्रह धरला. यासाठी नातेवाईकांनी मदत करावी असा हट्टही त्याने केला. यावेळी सगळ्यांनी त्याच्या या वेडेपणाला विरोध केला, मात्र रुक्मिणीशिवाय आपले पानही हलू शकणार नाही, असे सांगत ओंकारदासने कुणाचेच ऐकले नाही. अखेरीस त्याच्या हट्टापुढे नातेवाईकांना हार पत्करावी लागली. घरातचट पत्नीचे दफन करण्यासाठी खड्डा खणण्यात नातेवाईकांनी त्याची मदत केली. हा सगळा प्रकार घरात सुरु असताना शेजारचे मात्र वैतागले होते. त्यांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केला मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर ओंकारदासचे शेजारी थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचले. जिल्हा प्रशासनाची टीम जेव्हा घरात मृतदेह नेण्यासाठी आली, तेव्हा मोगरे याने त्यांना विरोध केला.
शिक्षक ओंकारदास मोगरे सगळ्यांना सांगत होता की, मनुष्य आणि आत्मा हे समानच असतात. त्यामुळे रुक्मिणीचे शरीर दुसरीकडे नेण्याची गरज नाही. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप केला आणि मृतदेह बाहेर काढण्याची परवानगी दिल्यानंतर ओंकारदासने माघार घेतली. ओकांरदासच्या एका नातेवाईकाने सांगितले की एकटाच असल्याने ओंकारदास पत्नीच्या मृत्यूनंतर कोलमडून पडलेला आहे. अखेरच्या क्षणापर्यंत पत्नीचे शरीर घरात राहावे अशी त्याची इच्छा होती.