नवी दिल्ली – केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani)यांच्याकडे अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाची प्रभारी जबाबदारी आली आहे. तर हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde)यांच्याकडे पोलाद मंत्रालयाचा प्रभार देण्यात आला आहे. स्मृती इराणी या अमेठीतून राहुल गांधींचा पराभव करत स्मृती इराणी लोकसभेत पोहचल्या होत्या. तर ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशातून भाजपाचे राज्यसभा खासदार आहेत. मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi)यांनी बुधवारी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे अल्पसंख्याक कल्याण खाते होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. ते मोदींच्या मंत्रिमंडळात आठ वर्ष कार्यरत होते. नकवी आज शेवटच्या कॅबिनेट बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी नकवी यांच्या कार्याचे कौतुकही केले.
नकवी यांच्यासोबतच पोलादमंत्री आरसीपी सिंह यांचीही आजची कॅबिनेट बैठक अखेरची बैठक होती. या दोन्हीही मंत्र्यांनी देशाच्या विकासात मोठी कामगिरी केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या दोन्ही मंत्र्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ हा 7 जुलैला संपणार आहे. मुख्यात अब्बास नकवी हे राज्यसभेचे सदस्य होते. गुरुवारी त्यांचा काार्यकाळ संपणार आहे. नकवी यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपा त्यांना मोठी जबाबदारी देईल, असे सांगण्यात येते आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात संयुक्त जनता दलाचे नेते आणि मंत्री आरसीपी सिंह यांचाही कार्यकाळ गुरुवारी संपतो आहे. हे दोघेही आता कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतील. कोणत्याही सभागृहाचे सदस्यत्व नसतानाही ते सहा महिने मंत्रिपदावर राहू शकतात. मात्र मोदींनी या दोघांनाही मंत्रिमंडळातून काढले आहे.
नकवी 2010 ते 2016 उ. प्रदेशातून राज्यसभेवर होते. 2016 साली त्यांना झरखंडमधून संधी देण्यात आली. 1998 साली पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री झाले. त्यानंतर 26 जुलै 2014 साली मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे अल्पसंख्याक आणि संसदीय कार्य याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले. 12 जुलै 2016 रोजी नजमा हेप्तुल्ला यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना अल्पसंख्याक विभागाचा स्वतंत्र प्रभार देण्यात आला. 30 मे 2019 रोजी मोदींच्या मंत्रिमंडळात पुन्हा सहभागी झाल्यानंतर त्यांचे अल्पसंख्याक कल्याण खाते अबाधित राहिले होते.
आरसीपी सिंह हे भाजपात जाण्याची शक्यता आहे. अजून ते भाजपात आले नसल्याचे एका दिवसापूर्वीच भाजपाने स्पष्ट केले आहे. आरसीपी भाजपात जाणे, हे संयुक्त जनता दलाला न पटणारे ठरु शकते. सध्या राज्यसभेत राष्ट्रपती नामनिर्देशीत सात जागा रिकाम्या होत्या, त्यातील चार जणांची घोषणा आज करण्यात आली आहे. त्यात पी टी उषा, इलाईराजा यांचा समावेश आहे.