लखनऊ : पुढच्यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी इंडिया आघाडीच्या छताखाली काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र आले आहेत. पण आता या दोन पक्षांमध्ये मतभेदांची दरी रुंदावू शकते अशी स्थिती आहे. चारवेळा खासदार राहिलेल्या रवी वर्मा यांनी समाजवादी पार्टीमधून राजीनामा दिला आहे. मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव या दोन्ही नेत्यांचे विश्वासू अशी रवी वर्मा यांची ओळख होती. मागच्या काही दिवसांपासून रवी वर्मा समाजवादी पार्टीच्या कार्यक्रमांमध्ये दिसत नव्हते. रवी प्रकाश वर्मा यांनी 2 नोव्हेंबरला आपला राजीनामा सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना पाठवला. लखीमपुरखीरी येथे पक्षामध्ये जी अंतर्गत स्थिती आहे, त्यामुळे मी काम करण्यास असमर्थ आहे, असं रवी वर्मा यांनी पत्राल लिहिलय़. त्यांनी सपाच्या प्राथमिक सदस्यत्यावाचा राजीनामा दिलाय.
रवी वर्मा यांची नाराजी दूर करण्यासाठी अखिलेश यादव यांनी सुद्धा प्रयत्न केले. पण त्याने काही साध्य झालं नाही. रवी वर्मा यांच्या पक्ष सोडण्याचा अखिलेश यादव यांच्या पीडीए फॉर्म्युल्यावर परिणाम होऊ शकतो. ते बिगर यादव नेते होते. रवी प्रकाश वर्मा यांचा समाजवादी पार्टीच्या मोठ्या नेत्यांमध्ये समावेश व्हायचा. लखीमपुर खीरीमधून तीनवेळा त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली. 2009 पर्यंत ते खासदार होते. त्यानंतर ते निवडणूक हरले. अखिलेश यादव यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं. त्यांची मुलगी पूर्वी वर्माला मागच्यावेळी समाजवादी पार्टीने लोकसभेच तिकीट दिलं होतं. पण तिचा पराभव झाला.
कुठल्या पक्षात करणार प्रवेश?
रवी प्रकाश वर्मा काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत. आज त्यांनी समर्थकांची बैठक बोलवली आहे. “मागच्या काही दिवसांपासून समाजवादी पार्टीमध्ये गुदमरल्यासारख होत होतं. पक्ष मुलायमसिंह यादव यांच्या मार्गावरुन भरकटला आहे. पक्षात सामूहिकपद्धतीने निर्णय प्रक्रियेची परंपरा संपली आहे” अशी टीका रवी वर्मा यांनी केली होती.