कुवेत येथील आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे मृतदेह मोदी सरकार मायदेशी आणणार आहेत. यासाठी भारतीय हवाई दलाकडे जबाबदारी सोपवण्यात आलीये. कुवेतमध्ये मंगफ भागातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४० हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाला होता. कुवेतमध्ये मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांचे मृतदेह परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाचे विमान सज्ज ठेवण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह तातडीने परत आणण्यासाठी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेतला पोहोचले आहेत.
अल-मंगफ इमारतीला लागलेल्या आगीत एकूण 49 जणांचा भाजून मृत्यू झाला होता. त्यापैकी 42 जण भारतीय असल्याचे समजते, अशी माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली आहे. कुवेतला पोहोचल्यानंतर किर्तीवर्धन सिंह यांनी कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांची भेट घेतली. कुवेतमधील भारतीय दूतावासाने सांगितले की अल-याह्या यांनी वैद्यकीय सेवा, मृतदेह त्वरित परत आणणे आणि घटनेच्या तपासासह संपूर्ण मदतीचे आश्वासन दिले आहे. दूतावासाने ‘X’ वर म्हटले की, “परराष्ट्र मंत्री याह्या यांनी या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. त्यांनी वैद्यकीय सेवा, मृतदेह त्वरित परत आणणे आणि घटनेची चौकशी करण्यासह संपूर्ण मदतीचे आश्वासन दिलेत.”
“राज्यमंत्र्यांनी सर्व संबंधित कुवेती अधिकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले,” दूतावासाने सांगितले. अल-याह्या यांनी गुरुवारी परदेशी कामगारांच्या निवासस्थानातील अपार्टमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे प्रभावित भारतीयांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आणि या दुर्घटनेची त्वरित चौकशी करण्याचे आश्वासन दिले. सिंह यांनी मुबारक अल कबीर हॉस्पिटललाही भेट दिली जिथे सात जखमी भारतीय दाखल आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी रात्री एक निवेदन जारी केले होते की, “कुवेतच्या मंगफ भागात पहाटे एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी आणि दुःखद घटनेत सुमारे 40 लोकांचा मृत्यू झाल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबाबत ‘दुःख’ व्यक्त केले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा यांच्यासह इतरांशी बैठकीत या घटनेबाबत चर्चा झाली आणि माहिती घेण्यात आली. यानंतर मोदींनी मृत भारतीयांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया रक्कम जाहीर केलीये. सरकारने सर्व शक्य मदत पुरवावी असे निर्देश दिले आहेत. परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांचे कुवेती समकक्ष अल-याह्या यांच्याशी फोनवर बोलून आगीत प्राण गमावलेल्या भारतीयांचे मृतदेह तात्काळ भारतात पाठवण्याची विनंती केली.