Amarnath Cloudburst : आस्मानी संकटानंतर अमरनाथ यात्रा तूर्तास थांबवली, हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू

| Updated on: Jul 10, 2022 | 9:35 AM

या पुरात अडकलेल्या भाविकांना बालाटल येथे आणण्यात येत आहे. लष्कराकडून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने चालणंही कठिण झालं आहे.

Amarnath Cloudburst : आस्मानी संकटानंतर अमरनाथ यात्रा तूर्तास थांबवली, हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू
आस्मानी संकटानंतर अमरनाथ यात्रा तूर्तास थांबवली, हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अमरनाथ: अमरनाथमध्ये ढगफुटी (Amarnath Cloudburst) झाल्यानंतर येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूर आला आहे. रस्ते खचले आहेत. वाहने फसली आहेत. अनेक लोक वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेकांशी संपर्क होत नाहीत. पुरात अडकलेल्या अनेकांचे हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन (rescue operation) केलं जात आहे. या परिसरात अजूनही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर (jammu kashmir) प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने तूर्तास स्थगित केली आहे. कुणीही अमरनाथकडे येऊ नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे अमरनाथ यात्रा सुरू व्हावी म्हणून भाविक प्रतिक्षा करत आहेत. कालच उत्तराखंडमधील केदारनाथ यात्राही स्थगित करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच अमरनाथमध्ये ढगफुटी झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही ठिकाणच्या यात्रा तात्पुरत्या रोखण्यात आल्या आहेत.

 

हे सुद्धा वाचा

शुक्रवारी संध्याकाळी अमरनाथ यात्रेच्या दरम्यान ढगफुटी झाली. त्यामुळे पाण्याचे लोटच्या लोट आले. त्यामुळे पर्यटकांचे तंबू या पाण्यात वाहून गेले. तंबूसह अनेक पर्यटकही वाहून गेले. या दुर्देवी घटनेत 16 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर 63 भाविकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं. अजूनही अनेक लोक बेपत्ता असल्याचं सांगितलं जातं. 28 रुग्णांना निलागरार येथे उपचारासाठी नेण्यात आलं आहे. 11 जणांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हेलकॉप्टरमधून श्रीनगरमध्ये आणण्यात आलं आहे. तर 15 जणांचे मृतदेह पवित्र गुफेतून निलागरर येथे आणण्यात आले आहेत.

हेल्प नंबर जारी

या पुरात अडकलेल्या भाविकांना बालाटल येथे आणण्यात येत आहे. लष्कराकडून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्याने चालणंही कठिण झालं आहे. वाहनेही या भागातून जात नाहीत. त्यामुळे कुणाला मदत हवी असेल किंवा काही विचारणा करायची असेल तर +91 9149720998 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. कॉल करणाऱ्यांनी नाव, यात्रेची नोंदणी, आरएफआयडी नंबर, संपर्क नंबर, आधार कार्ड नंबर, अखेरीस कुठे उतरला होता आणि कधी उतरला होता याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यातील 14 भाविकांचा संपर्क नाहीच

पुण्याच्या आळंदीतून अमरनाथ यात्रेला गेलेले 14 भाविक संपर्काबाहेर आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. धायरी येथे असणाऱ्या भोसले कुटुंबाचे तीन सदस्य हे या यात्रेसाठी गेले होते. यामध्ये सुनीता भोसले यांचं दुःखद निधन झालं. धायरीमध्ये राहणारे महेश राजाराम भोसले, सुनिता महेश भोसले, प्रमिला प्रकाश शिंदे हे तिघे बेपत्ता असल्याची माहिती आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी धायरी येथे भोसले कुटुंबाची भेट घेत त्यांच सांत्वन करत जिल्हा प्रशासनाशी भोसले कुटुंबाचा संपर्क देखील करून दिला आहे.