नवी दिल्ली : भारताकडून आता जशास तस उत्तर मिळत, हे पाकिस्तानला कळून चुकलय. त्यामुळे सीमेवर सध्या शांतता आहे. पण भविष्यात पाकिस्तान कसा वागेल? याचा नेम नाही. त्यामुळे भारताने आतापासूनच पाकिस्तानचा सामना करण्यासाठी खास तयारी करुन ठेवली आहे. काल अपाचे हेलिकॉप्टर आर्मी एविएशन कॉर्प्समध्ये दाखल झालं. राजस्थानच्या जोधपूरमध्ये अपाचे हेलिकॉप्टरची पहिली स्क्वाड्रन तैनात करण्यात येईल. जोधपूर पाकिस्तानी सीमेपासून खूप जवळ आहे. सैन्याला गरज पडल्यास, दिवसा तारे दाखवण्यासाठी जोधपूरमध्ये अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहेत. अपाचेचा जगातील टॉप फायटर हेलिकॉप्टरमध्ये समावेश होतो.
आर्मी 5691 कोटी रुपयाच्या करारातंर्गत 6 हेवी-ड्यूटी अपाचे फायटर हेलिकॉप्टर्सचा आपल्या ताफ्यामध्ये समावेश करत आहे. अमेरिकेकडून अपाचे हेलिकॉप्टरची पहिली बॅच मे आणि अन्य हेलिकॉप्टर्स जूनमध्ये मिळतील. जोधपूर येथे आर्मीच्या अपाचे हेलिकॉप्टरची तैनाती करण्यात येईल. शत्रूच्या अगदी नजरेला नजर भिडवून अपाचे हेलिकॉप्टर्स पाकिस्तानची झोप उडवू शकतात. आर्मीचे पायलट आणि इंजिनिअर्सनी अपाचे हेलिकॉप्टर कस ऑपरेट करायच? त्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. अमेरिकी एयरोस्पेस बोइंगने भारतीय सैन्यासाठी सहा अपाचे फायटर हेलिकॉप्टर्सची निर्मिती केलीय.
किती घातक आहे अपाचे?
अपाचे हेलिकॉप्टर्सची जगातील टॉप फायटर हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. एएच-64ई अपाचे फायटर हेलीकॉप्टर हवेतून हवेत मारा करणारे मिसाइल, हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाइल, गन आणि रॉकेटने सुसज्ज आहे. अपाचे हेलिकॉप्टरमध्ये हेलफायर आणि स्टिंगर मिसाइलसह हायड्रा रॉकेट सुद्धा आहे.
अपाचे हेलीकॉप्टरमध्ये 1200 राऊंड 30 mm चेन गन आहे.
360 डिग्री कवरेजमुळे एएच-64ई अपाचे हेलीकॉप्टरची मारक क्षमता अधिक प्रभावी ठरते.
नाइट विजन सिस्टमसाठी नोज माउंटेन सेंसर सूट यात आहे. त्यामुळे या हेलिकॉप्टरची क्षमता आणखी वाढते.
हे हेलीकॉप्टर दिवस-रात्र आणि कुठल्याही हवामानात मिशन पूर्ण करु शकतं.
या हेलीकॉप्टरला रडारवर पकडण कठीण आहे.
मिसाइलसह हे हेलिकॉप्टर अनेक हायटेक टेक्निकने सज्ज आहे. म्हणून कठीण ऑपरेशनमध्ये याचा वापर करता येऊ शकतो.
मागच्या काही काळात भारताने सीमेवरील आपली तैनाती अजून मजबूत केली आहे. भारतीय सैन्याने चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या बॉर्डरवर घातक शस्त्रास्त्रांची तैनाती करुन आपली मारक क्षमता वाढवली आहे.