नवी दिल्ली: राम नवमीच्या दिवशी कावेरी वसतिगृहात झालेल्या हिंसेचं लोण अधिकच पसरताना दिसत आहे. रविवारी जेएनयूमध्ये (JNU Students) दोन गटात हाणामारी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले आहेत. काहींना गंभीर तर काहींना किरकोळ मार लागला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) सदस्यांनी विद्यार्थ्यांना मांसाहार भोजन करण्यास मज्जाव केला. त्यामुळे हिंसा भडकल्याचा आरोप छात्रसंघाने केला आहे. तर, रामनवमी (ram navami) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डाव्यांनी अडथळा निर्माण केला. त्यामुळे वाद झाल्याचा दावा एबीव्हीपीने केला आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. मात्र, भाजपते नेते आणि आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी नवीनच दावा केला आहे. त्यांनी या घटनेचं कनेक्शन मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांच्या मुदतवाढीशी जोडलं आहे. ज्या दिवशी येचुरी यांना एक्स्टेंशन मिळालं त्याच दिवशी ही घटना घडली हा योगायोग आहे. त्याच दिवशी जेएनयूमध्ये कॉम्रेडांनी गोंधळ घातला. एबीपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. जेएनयूचा कावेरी हा त्यांचा शेवटचा गड आहे, असं मालवयी यांनी म्हटलं आहे.
माकपा नेते सीताराम येचुरी हे जेएनयूमध्ये शिकलेले आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात एमए केलं आहे. त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडीसाठी जेएनयूमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली होती. त्यामुळे त्यांचं पीएचडीचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही.
सीताराम येचुरी यांची माकपाच्या महासचिवपदी तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. माकपाच्या 23व्या संमेलनात पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर पुन्हा निवड झाल्यानंतर त्यांनी भाजपवर निशाना साधला. भाजपला पराभूत करणं हेच माकपाचं लक्ष्य आहे. भाजप संघाचा हिंदुत्वावादी अजेंडा पुढे रेटत आहे. त्यामुळे आपल्याला भाजपला पराभूत करायचं आहे, असं येचुरी यांनी भाषणात म्हटलं होतं.
जेएनयूमधील हिंसेप्रकरणी दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे केले जात आहेत. हवन सुरू असताना डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी अडथळा निर्माण केल्याचा दावा एबीव्हीपीने केला आहे. तर, राम नवमीच्या दिवशी नॉनव्हेज खाण्यापासून एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी रोखल्याचा दावा छात्रसंघाने केला आहे. हिंसेशी संबंधित कथित व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात अख्तरिस्ता अंसारी या विद्यार्थ्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचं दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ कालच्या घटनेचाच आहे की नाही याची पृष्टी होऊ शकली नाही. एबीव्हीपीनेही या घटनेशी संबंधित काही व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. जेएनयूतील एका अपंग विद्यार्थ्यालाही मारहाण करण्यात आली असून त्याचे कपडेही फाडण्यात आल्याचा दावा एबीव्हीपीने केला आहे.
Is it a coincidence that on the day Sitaram Yechuri got an extension, comrades in JNU went on rampage, attacked ABVP activists, as if it was a vindication of sorts to see their supreme leader hold on to office for another term? Is Kaveri hostel of JNU their last bastion?
— Amit Malviya (@amitmalviya) April 11, 2022
संबंधित बातम्या:
JNU Violence LIVE: जेनएयूत नेमकं काय घडलं, जाणून घ्या राड्यामागची पाच कारणे
JNU VIDEO | Non Veg जेवणावरुन ‘जेएनयू’मध्ये राडा, दोन विद्यार्थी संघटना भिडल्या, सहा जण जखमी
VIDEO : गो तस्करांनी फिल्मी स्टाईलमध्ये चालत्या वाहनातून गायी फेकल्या, सहा जणांना अटक