नवी दिल्ली : “मी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केला नाही. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान प्रणव मुखर्जी, राजीव गांधी जिथे बसले अगदी तिथेच मी बसलो”, असा खुलासा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत केला. अमित शाह काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी रवींद्रनाथ यांच्या शांतीनिकेतन येथील आश्रमाला भेट दिली होती. मात्र, त्यांच्या या दौऱ्यानंतर सोशल मीडियावर शाह रवींद्रनाथ टागोर यांच्या खुर्चीवर बसल्याचा दावा काही लोकांनी केला होता.
काँग्रेस, टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी या मुद्द्यावरुन अमित शाह यांच्यावर सोशल मीडियावर निशाणा साधला होता. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या मुद्द्यावरुन लोकसभेत शाह यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर शाह यांनी संसदेत काही फोटो सादर करत स्पष्टीकरण दिलं.
“अधीर रंजन चौधरी यांनी माझ्यावर अशाप्रकारचे आरोप केले, यामध्ये त्यांची चूक नाही. खरंतर ही काँग्रेस पक्षाचीच समस्या आहे. मी गुरुदेव यांच्या खुर्चीवर बसलो नाही. मात्र, दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु रवींद्रनाथ टागोर यांच्या खुर्चीवर बसल्याचे काही फोटो माझ्याजवळ आहेत. राजीव गांधी देखील गुरुदेवांच्या सोफ्यावर बसून चहा पिताना दिसत आहेत. हे ऑन रेकॉर्ड आहे. प्रणव मुखर्जी, राजीव गांधी जिथे बसले अगदी तिथेच मी बसलो होतो”, असं अमित शाह म्हणाले.
“संसदेत जेव्हा आपण एखादा मुद्दा ठेवतो तेव्हा त्या मुद्द्याची आधी पडताळणी करुन घ्यावी. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टी संसदेत मांडल्यात तर संसदेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचेल. अधीर रंजन चौधरी यांची काँग्रेसची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांच्या मनात गैरसमज असू शकतात. त्यामुळे मला हे फोटो सभागृहाच्या पटलावर ठेवायची आहेत”, अशा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले.
अमित शाह यांनी संसदेत सादर केलेले फोटो पुढीलप्रमाणे :