हैदराबाद : 15 सप्टेंबर 2019 रोजी नियती रुसली आणि अप्पल राजू-भाग्यलक्ष्मी या दाम्पत्याच्या पदरातून तिने दोन मुलींना हिरावून नेलं. मात्र दोन वर्षांनी ठीक त्याच दिवशी नियतीने दोघांच्या पदरात पुन्हा दान टाकलं. 15 सप्टेंबर 2019 रोजी अप्पल राजू आणि भाग्यलक्ष्मी आपल्या लेकींच्या निधनाच्या बातमीने कोलमडले होते. त्यांचं आयुष्य अंधारमय झालं होतं. मात्र 15 सप्टेंबर 2021 रोजी दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, त्यांचं जीवन पुन्हा नव्या प्रकाशाने उजळून निघालं. कारण याच दिवशी त्यांना जुळे कन्यारत्न प्राप्त झाले.
नेमकं काय घडलं?
15 सप्टेंबर 2019… आंध्र प्रदेशात राहणाऱ्या अप्पल राजू आणि भाग्यलक्ष्मी यांच्या आयुष्यातील काळाकुट्ट दिवस. गोदावरी नदीत झालेल्या भीषण बोट दुर्घटनेत त्यांच्या दोन मुलींचा बुडून करुण अंत झाला. तेलंगणातील भाद्रचलम इथे असलेल्या राम मंदिरात आपल्या दोन नातींना घेऊन अप्पल राजू यांच्या मातोश्री निघाल्या होत्या. मात्र वाटेतच बोटीला भीषण अपघात झाला आणि बोट गोदावरी नदीत उलटून बुडाली होती. या दुर्घटनेत अप्पल राजूच्या दोन्ही मुली आणि आई यांना प्राण गमवावे लागले होते. एकूण 50 प्रवाशांना त्यावेळी जलसमाधी मिळाली होती.
पुन्हा अपत्यप्राप्तीचे प्रयत्न
अप्पल राजू आणि भाग्यलक्ष्मी एका काच उत्पादन करणाऱ्या कंपनीत नोकरी करत होते. या बोट दुर्घटनेमुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आपलं सर्वस्व गमावून बसल्याची भावना त्यांच्या मनात घर करुन बसली होती. मात्र वर्षभरानंतर ते या धक्क्यातून कसेबसे सावरले. आपल्याकडून हिरावलं गेलेलं सुख पुन्हा मिळवण्याचा निर्णय त्यांनी गेल्या वर्षी घेतला. त्यांनी आंध्र प्रदेशातील एका फर्टिलिटी सेंटरला भेट दिली होती. मात्र कोव्हिड 19 मुळे उद्भवलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वप्नांना पुन्हा टाचणी लागली.
त्याच दिवशी जुळ्या मुलींचा जन्म
अखेर आयव्हीएफ तंत्रज्ञानाने या दाम्पत्याच्या आयुष्यात पुन्हा आनंदाची लकेर उमटवली. 15 सप्टेंबर 2021 रोजी त्यांच्या जुळ्या मुलींचा जन्म झाला. आयुष्यात काळोख पसरलेल्या दाम्पत्यासाठी नवा आशेचा किरण उगवला आहे. “आम्ही अत्यानंदी झालो आहोत. ही देवाची किमया आहे. हा परमेश्वराचा आशीर्वाद आहे” अशा भावना सद्गदित भाग्यलक्ष्मीने व्यक्त केल्या आहेत. 15 सप्टेंबर ही तारीख त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. कारण ज्या दिवशी, त्यांचं सर्वस्व गेलं, त्याच दिवशी भरभरुन मिळालंही.
दाम्पत्याला परमोच्च आनंद
“माझी कूस उजवेल, अशी आशा मला तंत्रज्ञानामुळे वाटत होती, मात्र जुळ्या कन्यांच्या रुपाने माझ्या दोन्ही मुली परत येतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. हा खरंच देवीचा आशीर्वाद आहे” असं भाग्यलक्ष्मी म्हणाली.
“अप्पल राजू-भाग्यलक्ष्मी या दाम्पत्याची केस आम्ही आव्हान म्हणून प्राधान्याने स्वीकारली होती. त्या दोघांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं.” अशी माहिती डॉ. सुधा पद्मश्री यांनी दिली. जुळ्या बाळांची वजनं 1.9 किलो आणि 1.6 किलो इतकी असून बाळ-बाळंतीण तिघीही सुखरुप आहेत.
इतर बातम्या :
विराटचा आणखी एक मोठा निर्णय, यंदाच्या आयपीएलनंतर आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार
ऋतुराज गायकवाडची दुबईत दबंगगिरी, बोल्ट-बुमराहची धुलाई करत मुंबईला नमवलं
धोनीचे धुरंदर मुंबईवर भारी, ऋतुराजच्या आक्रमक खेळीसह 20 धावांनी विजय