तिरुपतीला जावून बालाजींचं दर्शन घ्यावं, अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज हजारो भाविक तिरुपतीला जावून बालाजींचं दर्शनही घेतात. तिरुपतीचं बालाजींचं मंदिर हे जागृत देवस्थान आहे. पण याच मंदिरात आज अतिशय हृदय हेलावणारी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकनसाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर लायनीत उभे आहेत. या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी लायनीत उभे राहायला सांगितले तेव्हा ही चेंगराचेंगरीची घटना घडली.
चेंगराचेंगरीनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्यात चार भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये मल्लिका नावाच्या एका महिलेचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिरुपती पोलिसांनी प्रयत्न केले. त्यांनी थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रणही मिळवलं.
दर्शन घेण्यासाठी पास घेण्यासाठी तब्बल 4 हजार भाविक उभे होते, अशी माहिती मिळत आहे. इथल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर समितीचे चेअरमन बीआर नायडू यांनी आपातकालीन बैठक बोलावली आहे. त्यांनी फोनवरुन अधिकाऱ्यांशी बातचिक करुन घटनेची माहिती जाणून घेतली आहे. तसेच बैठकीनंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.