मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी व्हावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी सीबीआयची चौकशी टाळण्यासाठी धावाधाव सुरु केली आहे. अनिल देशमुख यांच्याकडून सीबीआय चौकशीच्या (CBI) निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची दाट शक्यता आहे. (Anil Deshmukh meet lawyer Abhishek Manu singhvi in delhi)
सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने दिल्ली गाठली. याठिकाणी त्यांनी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. अनिल देशमुख हे सिंघवी यांच्या घरी गेले होते. याठिकाणी अनिल देशमुख, अभिषेक मनु सिंघवी आणि वकिलांच्या एका टीममध्ये साधारण तासभर चर्चा सुरु होती. त्यामुळे अनिल देशमुख सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार, असल्याचे सांगितले जाते.
मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या पत्रासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. न्यायालयाने सीबीआयला अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांचीच मुदत दिली आहे. त्यामुळे सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे पथक आजच मुंबईत दाखल होईल.
मुंबईत आल्यानंतर सीबीआयच्या पथकाकडून सर्वप्रथम मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांनी यापूर्वीच आपल्याकडे आणखी पुरावे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता ते सीबीआयकडे अनिल देशमुख यांच्याविरुद्ध कोणती माहिती देणार, हे पाहावे लागेल.
परमबीर सिंह यांच्या चौकशीनंतर सीबीआय आपला मोर्चा साहजिकच अनिल देशमुख यांच्याकडे वळवेल. सीबीआयकडून अद्याप मुंबईतील चौकशीचे ठिकाणही गुप्त ठेवण्यात आले आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिलं होतं.
इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती.
संबंधित बातम्या :
अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक
(Anil Deshmukh meet lawyer Abhishek Manu singhvi in delhi)