Loksabha election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला तीन धक्के बसले आहेत. आधी ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला. पंजाबमध्ये देखील आप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे देखील इंडिया आघाडीतून बाहेर पडून एनडीए सोबत सहभागी झाले आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षांना पुन्हा आपल्याकडे खेचले आहे. भाजपने आपल्या रणनीतीने मित्रपक्षांना आपल्या गोटात ओढून काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. भाजप आता आणखी एक धक्का देण्याची तयारी केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी जयंत चौधरी यांच्या आरएलडी आणि भाजपमध्ये युती होणार असल्याची माहिती आहे. यामुळे पश्चिम उत्तर प्रदेशात आरएलडीला 4 जागा मिळू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीला आणखी एक झटका लागू शकतो. कारण भाजप एकएक करुन मित्रपक्षांना पुन्हा एकजा जवळ करु लागला आहे.
भाजपने इंडिया आघाडीतील आरएलडीला आपल्या गोटात खेचण्याची योजना आखली आहे. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांच्यातील बोलणी जवळपास निश्चित झाली आहे. जयंत चौधरी दिल्लीत येणार असल्याचं देखील सांगितले जात आहे. त्यानंतर युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत चौधरी यांच्या पक्षाला एकूण चार जागा मिळू शकतात. पश्चिम यूपीमध्ये त्यांची चांगली पकड आहे, त्यामुळे भाजपने त्यांना जवळ केले आहे. भाजप हायकमांडनेही यासाठी मान्यता दिली आहे. दोन्ही पक्षांची युती होणार हे निश्चित मानले जात आहे. याचा मोठा झटका अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला बसणार आहे.
अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जयंत चौधरी यांना 7 जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहित आहे. पण आता भाजपने त्यांना आपल्याकडे खेचले आहे. युतीची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते.
राममंदिराच्या लाटेवर भाजपला रोखणे कठीण असल्याचं अनेक घटकपक्षांना वाटत आहे. त्यामुळे हे पक्ष भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाजपला देखील लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.