मोठ्या शहरांमध्ये अनेक मजले असणाऱ्या इमारती असतात. त्या ठिकाणी लिफ्ट असणे ही गरज झाली आहे. परंतु या लिफ्टमुळे अनेक वेळा अपघात झाल्याचे समोर आले आहे. विद्युत पुरवठा खंडत झाल्यामुळे लिफ्ट बंद पडली. त्यावेळी लिफ्टमध्ये एक 42 वर्षीय महिला होती. त्यानंतर तब्बल 45 मिनिटे ती महिला मदतीसाठी आवाज देत राहिली. परंतु लगेच मदत मिळाली नाही. अखेर तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरु असताना ती महिला तिसऱ्या मजल्यावरुन कोसळली. त्यात तिचा मृत्यू झाला. राजस्थानमधील कोटा शहरात ही घटना घडली. त्यामुळे लिफ्ट असणाऱ्या इमारतींमधील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
कोटामधील अपार्टमेंटमध्ये रुक्मणीबाई (वय 42) या घरकाम करत होत्या. त्या काम करुन अपार्टमेंटमधून जाताना लिफ्टने खाली उतरु लागल्या. त्यावेळी वीज पुरवठा खंडीत झाला. लिफ्ट दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्या दरम्यान अडकली. त्यावेळी अपार्टमेंटमध्ये सर्व फ्लॅटमध्ये महिला होत्या. रुक्मणीबाई मदतीसाठी आवाज देत राहिल्या. अपार्टमेंटमधील महिलांपर्यंत तिचा आवाज गेल्यानंतर अनेक जणांनी लिफ्टकडे धाव घेतली.
महिलांनी अपार्टमेंटमधील लिफ्टची इमरजन्सी चावीचा वापर करुन अडकलेल्या लिफ्टचा दरवाजा उघडला. रुक्मणीबाई यांना स्टूल दिला. त्या स्टूलवर चढून वरती येण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु त्यांचा पाय घसरला आणि त्या लिफ्टमध्ये पडल्या. मग लिफ्ट बेसमेंटपर्यंत गेली. या अपघातात रुक्मणीबाई यांचा मृत्यू झाला.
रुक्मणीबाई यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबियांनी अपार्टमधील लोकांकडून वेळेवर मदत मिळाली नसल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप लावला. त्या खूप वेळेपर्यंत मदतीसाठी बोलवत राहिल्या. परंतु मदतीसाठी कोणीच आले नाही. अपार्टमेंटमधील लोकांनी कुटुंबियांना त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले होते. परंतु त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला होता, असे त्यांचा कुटुंबियांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकाराची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली.