लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे बाकी असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला मोठा इशारा दिला आहे. आमच्या सर्व नेत्यांना एक एक करून अटक करण्यात येत आहे. सत्येंद्र जैन, मनिष सिसोदिया आणि संजय सिंह यांना तुरुंगात टाकलं. त्यानंतर मला तुरुंगात टाकलं. आता माझ्या पीएची अटक करण्यात आली आहे. भाजप एवढ्यावरच थांबणार नाही. तर आता राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनाही तुरुंगात टाकणार आहे, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत केला. एक एक करून आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं जात असेल तर आम्हीच आमची अटक करून घेतो. आम्ही उद्या भाजपच्या कार्यालयात अटक करून घ्यायला जात आहोत, असं केजरीवाल म्हणाले.
आमचा अपराध काय आहे? आम्ही दिल्लीत चांगल्या शाळा बनवल्या आहेत. चांगले रुग्णालय बांधले आहेत. मोफतमध्ये उपचार केले आहेत. मोफतमध्ये वीजही दिली आहे. पूर्वी दिल्लीत 10-10 तास वीज गायब असायची. आता दिल्लीत 24 तास वीज आहे. केंद्र सरकारला दिल्लीतील सरकारी शाळा बंद करायच्या आहेत. यांना दिल्लीतील रुग्णालये आणि मोहल्ला क्लिनिक नकोय, असा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच सवाल केला. पंतप्रधानांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जेल जेलचा खेळ खेळत आहात. कधी एका तुरुंगात टाकता तर कधी दुसऱ्या. कधी मनिष सिसोदियांना तुरुंगात टाकता तर कधी मला. तर कधी संजय सिंह यांना. उद्या मी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सर्व नेत्यांसह दुपारी 12 वाजता भाजपच्या हेड क्वॉर्टरला येत आहे. ज्यांना ज्यांना तुम्हाला तुरुंगात टाकायचं आहे, त्या सर्वांना एकत्रच तुरुंगात टाका, असं आव्हानच त्यांनी दिलं.
तुरुंगात टाकून आम आदमी पार्टी फोडू असं तुम्हाला वाटतं. पण आप फुटणार नाही. तुम्ही एकदा तुरुंगात टाकून तर पाहा. आम आदमी पार्टी एक विचार आहे. संपूर्ण देशातील लोकांच्या हृदयात हा विचार बसला आहे. तुम्ही आपच्या जेवढ्या नेत्यांना तुरुंगात टाकाल, त्याच्या शंभरपटीने देशात नेते जन्माला येतील, असंही ते म्हणाले.