नवी दिल्ली: गेल्या 50 वर्षापासून सुरू असलेला आसाम (Assam) आणि मेघालयाचा (Meghalaya) सीमावाद (Border Dispute) अखेर मिटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मेघालयाच मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी ऐतिहासिक करारावर हस्ताक्षर केले. यावेळी खासदार दिलीप सेकियाही उपस्थित होते. तसेच दोन्ही राज्याचे मुख्य सचिव आणि गृह खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन्ही राज्यांना 31 जानेवारी रोजी चौकशी आणि विचार करण्यासाठी एक प्रस्ताव दिला होता. सीमा वादाचा मसुदा दिल्याच्या दोन महिन्यानंतर अखेर मेघालय आणि आसामने समझोता करारावर सह्या केल्या. त्यामुळे दोन्ही राज्यात सुरू असलेला सीमावाद अखेर संपुष्टात आला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये आता या प्रश्नावरून होणारे तणावही कायमचे दूर झाले आहेत.
या ऐतिहासिक करारानंतर अमित शहा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दोन्ही राज्यातील सीमा वादाची समस्या 70 टक्के निकाली निघाली आहे, असं शहा म्हणाले. तर, जो काही वाद बाकी आहे, तो चर्चेद्वारा सोडवला जाईल, असं दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच आजचा दिवस दोन्ही राज्यांसाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ऐतिहासिक करारावर सह्या झाल्यानंतर अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने धन्यवाद दिले. विकसित नॉर्थ ईस्टचं जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलं आहे, ते लवकर पूर्ण होईल, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी सातत्याने नॉर्थ ईस्टच्या गौरवासाठी काम केलं आहे, असंही ते म्हणाले. 2019मध्ये त्रिपुरात शस्त्र गटा दरम्यान करार झाला होता.
आसाम आणि मेघालया दरम्यान 884 किलोमीटरची सीमा आहे. या दोन्ही राज्यांदरम्यान 12 क्षेत्रांवरून वाद होता. त्यातील सहा क्षेत्रांचा वाद सोडवण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला होता. 36.79 वर्ग किमी जमिनीसाठी प्रस्तावित शिफारशीनुसार आसाम 18.51 वर्ग किमी भाग आपल्याकडे ठेवणार आहे. तर उरलेला 18.28 वर्ग किमी भाग मेघालय आपल्याकडे ठेवणार आहे.
1972 पासून मेघालय आणि आसाम दरम्यान सीमा वाद सुरू आहे. आसामपासून मेघालय वेगळा झाला तेव्हापासूनच हा वाद सुरू आहे. नव्या राज्यांच्या निर्मितीच्या प्राथमिक करारांमध्ये सीमांचं सीमांकन आणि विविध रिडिंगमुळे हा वाद निर्माण झाला होता. या सीमावादावरून अनेक वेळी दोन्ही राज्यांदरम्यान हिंसक घटनाही घडल्या आहेत. 2010मध्ये तर झालेल्या हिंसेत पोलीस गोळीबारात चार लोकांचा मृत्यू झाला होता. आसामचा नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मिझोरामशीही वाद आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादही गेल्या 50 वर्षापासून भिजत पडलेला आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. राज्यांची निर्मिती करताना भाषिक बहुसंख्य मुद्द्यावर सीमा ठरवण्यात आल्या होत्या. मात्र, बेळगावच्या बाबत हा मुद्दा विचारात घेण्यात आला नव्हता. बेळगाव, कारवार, निपाणीमध्ये मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक असूनही हा भाग कर्नाटकाला देण्यात आला आहे. त्यामुळे हा भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. मात्र, आजपर्यंत हा प्रश्न सुटलेला नाही.
संबंधित बातम्या: