नवी दिल्ली: आसाम-मिझोरम सीमेवरील हिंसाचारात आसाम पोलिसांच्या 6 जवानांचा मृत्यू झाला आहे.आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. आसामच्या पोलीस दलात कछार जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असणारे मराठमोळे अधिकारी वैभव निंबाळकर हे देखील यामध्ये जखमी झाले आहेत. मिझोरममधील गटाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्या पायात गोळी लागली आहे. निंबाळकर यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती आहे.
गेल्या काही दिवसांत आसाम आणि मिझोरम राज्यांमधील तणाव वाढला असून सोमवारी दगडफेकही झाल्याचे चित्र समोर आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम आणि मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांसोबत सीमा वादावर चर्चेतून मार्ग काढण्यास सांगितलं आहे.
I am deeply pained to inform that six brave jawans of @assampolice have sacrificed their lives while defending constitutional boundary of our state at the Assam-Mizoram border.
My heartfelt condolences to the bereaved families.
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) July 26, 2021
हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी संध्याकाळी ट्विट करुन, आसाम-मिझोरम सीमेवर आमच्या राज्याच्या घटनात्मक हद्दीचे रक्षण करणाऱ्या आसाम पोलीस कर्मचार्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची त्यांनी माहिती दिली. मृत पोलीस जवानांच्या कुटूंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो,असं हिमंताा बिस्वा सरमा म्हणाले. आसाम पोलिसांकडून मिझोरममधील समाज कंटकांच्या गटानं दगडफेक केल्याचा आणि आसामच्या सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याचा दाव करण्यात आला होता. आसामच्या लैलापूर जिल्ह्यावरुनही दोन्ही राज्यामध्ये वाद आहे. मिझोरम लैलापूरवर हक्क सांगत आहे.
आसाममधखील बराक घाटी परिसरातील कछार, करीमगंज आणि हाईलकांडीची 164 किमीची सीमा मिझोरम राज्यातील आईजोल, कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते. जमीनीच्या कारणावरुन ऑगस्ट 2020 पासून आतंरराज्य सीमेवर संघर्ष सुरु झाला आहे. मिझोरमचे पोलीस महानिदेशक लालबियाकथांगा खिंगागते यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये वादग्रस्त भागात एटलांन नदीच्या जवळील भागात रात्री आठ झोपड्या जाळण्यात आल्याचं सांगितलं. हिमंता बिस्वा सरमा आसामचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संघर्ष वाढला आहे. गेल्यावर्षी झालेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला होता.
आसाम आणि मिझोरममधील आंतरराज्यीय सीमा वादावरुन दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप प्रत्यारोप केले आहेत. वादग्रस्त भागात आसाम आणि मिझोरममधील पोलीस दल आणि सामान्य नागरिकांमध्ये संघर्ष झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. तिथे गोळीबार झाल्याचं समोर आलं होतं. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन आरोप प्रत्यारोप केले मात्र नंतर त्यांच्यात चर्चा झाल्याचं सागंण्यात आलं आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक देखील झाली होती.
मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामगांथा यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना त्याची आठवण करुन दिली. गृहमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर आसाम पोलिसांच्या दोन तुकड्या आणि नागरिकांनी मिझोरममध्ये वॅरेनग्टे ऑटो रिक्षा स्टँडवर लाठीचार्ज करुन अश्रूधुराच्या कांड्या फोडल्याचं सांगितलं. सीआरपीएफच्या जवानांनी मिझोरम पोलिसांवर आक्रमण केल्याचा दावा मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी केला.
इतर बातम्या:
कर्नाटकाचा पुढचा मुख्यमंत्री लिंगायत समुदायातील नको; येडियुरप्पा यांची भाजपला सूचना