मुंबई : पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. अशावेळी या राज्यात कोणता पक्ष बाजी मारणार? असा प्रश्न सर्वपक्षीय नेतेमंडळींसह मतदारांनाही पडलाय. अशावेळी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने एक सर्वे केलाय. या सर्वेनुसार उत्तर प्रदेशात भाजपला 259 ते 267 जागा मिळतील. तर समाजवादी पक्षाला 109 ते 117, बसपाला 12 ते 16, तर काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या नुसार उत्तर प्रदेशातील सत्ता भाजप राखेल. मात्र, त्यांच्या संख्येत मोठी घट होऊन समाजवादी पक्षाला मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. (ABP News-C Voter Survey on Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab, Goa and Manipur Assembly Elections)
उत्तर प्रदेशातील 45 टक्के लोक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कामाकाजावर समाधानी आहेत. तर 34 टक्के लोक असमाधानी आहेत. तर विरोधी पक्षांनी आपली भूमिका योग्यरित्या निभावली का? असा सवालही मतदारांना विचारण्यात आला होता. त्यावेळी 40 टक्के लोकांनी विरोधी पक्षाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलंय. तर 34 टक्के लोक विरोधकांवर नाराज आहेत.
उत्तर प्रदेशला लागून असलेल्या उत्तराखंडमध्येही पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. उत्तराखंडमध्ये भाजपला 44 ते 48 जागा मिळण्याचा अंदाज एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आलाय. तर काँग्रेसला 19 ते 23 जागा, आम आदमी पक्षाला 0 ते 4 जागा, तर अन्य पक्षांना 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर 36 टक्के लोक समाधानी असल्याचं या सर्वेतून दिसून येत आहे.
तिकडे पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता या सर्वेक्षणातून व्यक्त केली गेलीय. पंजाबमध्ये काँग्रेसला 38 ते 46 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मोठी उभारी घेण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 51 ते 57 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सर्वेक्षणानुसार पंजाबमधील लोक 18 टक्के लोक कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छितात. तर 22 टक्के लोक अरविंद केजरीवाल यांना पसंती देत आहेत. 19 टक्के लोक सुखबीर बादल यांना, 16 टक्के लोक भगवंत मान यांना, 15 टक्के लोक नवज्योत सिंह सिद्धू यांना तर 10 टक्के लोक अन्य चेहऱ्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून पाहू इच्छित आहेत.
गोव्यात भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 15 टक्के, आम आदमी पक्षाला 22 टक्के तर अन्य पक्षाला 24 टक्के मतं मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. या सर्वेक्षणानुसार गोव्यात पुन्हा एकदा भाजपचं सरकार असेल. भाजपच्या खात्यात 22 ते 26 जागा, काँग्रेसच्या खात्यात 3 ते 7 जागा, आम आदमी पक्षाला 4 ते 8 जागा आणि अन्य पक्षाला 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेक्षणानुसार मणिपूरमध्ये भाजपला 40 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 35 टक्क, एनपीएफला 6 टक्के आणि 17 टक्के मतं इतरांना मिळू शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
इतर बातम्या :
नाट्यगृह उघडणार, तिसरी घंटा पुन्हा वाजणार! 5 नोव्हेंबरपासून नाट्यगृह सुरु करण्याचे आदेश
ABP News-C Voter Survey on Uttar Pradesh, Uttarakhand, Punjab, Goa and Manipur Assembly Elections