अयोध्या | 15 जानेवारी 2024 : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिरात, श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याआधी उद्यापासून 6 दिवस विधी पूजन सुरु होणार आहे. तर 22 तारखेचा मुहूर्त आणि गर्भगृहात कोण कोण हजर असतील, याचीही माहिती देण्यात आलीय. 22 जानेवारीला भगवान श्री राम लल्लांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेआधी, 6 दिवसांच्या पूजन विधीला सुरुवात होणार आहे. या सहा दिवसांचं वेळापत्रक समोर आलं आहे.
पूजन विधी 21 जानेवारीपर्यंत असेल आणि 22 जानेवारीला दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्राण प्रतिष्ठेला सुरुवात होईल आणि 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल. प्राण प्रतिष्ठा सुरु असताना मंदिरातल्या गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास आणि सरसंघचालक मोहनभागवत उपस्थित असतील.