Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरात पुजारी म्हणून सेवा करण्याची सूवर्णसंधी, मंदिर ट्रस्टकडून नोटीफिकेशन जारी

| Updated on: Oct 23, 2023 | 7:16 PM

अयोध्येतील भव्य राम मंदिर देशभरातील लाखो भाविकांसाठी लवकरच दर्शनासाठी खुलं होणार आहे. त्याआधी श्रीराम मंदिर ट्रस्टने पुजारी पदासाठी भरतीचं नोटीफिकेशन काढलं आहे. त्यामुळे अनेकांचं राम मंदिरात सेवा करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिरात पुजारी म्हणून सेवा करण्याची सूवर्णसंधी, मंदिर ट्रस्टकडून नोटीफिकेशन जारी
ayodhya
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अयोध्या | 23 ऑक्टोबर 2023 : अयोध्येतील राम मंदिरात सेवा करायची संधी मिळावी, अशी जगभरातील पुजाऱ्यांची इच्छा असेल. अयोध्या राम मंदिर हे हिंदूंचं महत्त्वाचं श्रद्धास्थान. त्यामुळे या ठिकाणी पुजारी म्हणून सेवा करण्याची संधी मिळावी, यासाठी अनेकजण धडपड करतील. अयोध्येतील श्रीराम मंदिर ट्रस्टला देखील चांगल्या पुजाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे राम मंदिर ट्रस्टने पुजाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने भरती काढली आहे. त्यामुळे पुजारी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करुन राम मंदिरात सेवा करण्याची सूवर्णसंधी मिळवू शकणार आहेत.

अयोध्येत श्रीरामांचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. अतिशय मोठं आणि भव्य असं हे मंदिर असणार आहे. या मंदिराचं बांधकाम आता अंतिम टप्प्यावर आलं आहे. अयोध्यातील नव्या राम मंदिरात तीन महिन्यांनी 22 जानेवारीला श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमाला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते नव्या मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या दरम्यान मंदिराचा वाढता विस्तार आणि भाविकांची वाढती गर्दी याचा विचार करुन पूजा-पाठ आणि इतर गोष्टींसाठी मंदिर ट्रस्टकडून पुजाऱ्यांची भरती केली जात आहे. मंदिर ट्रस्टकडून याबाबत अधिकृत नोटीफिकेशन काढण्यात आलं आहे.

अयोध्येत श्रीरामांचं भव्य मंदिर बनत आहे. या मंदिरात नव्या पुजाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. विशेष म्हणजे या भव्य मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होण्याआधी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून इच्छुकांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या भरतीत कुशल पुजाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामागील कारणही तसंच आहे. अयोध्येतील राम मंदिर हे देशभरातील हिंदू भाविकांचं मोठं श्रद्धास्थान असणार आहे. त्यामुळे तिथे तशाच पात्रतेचे हुशार पुजारी असणं अपेक्षित आहेत.

पुजारी पदासाठी नेमके निकष काय?

पुजारी पदाच्या नोकरीसाठी 31 ऑक्टोबर 2023 ही शेवटची तारीख असल्याची माहिती मिळत आहे. ही नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर त्यांना 6 महिन्यांची ट्रेनिंग दिली जाईल. उमेदवारांना विशेष ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांची पुजारी म्हणून मंदिरात नियुक्ती केली जाईल. उमेदवारांना ट्रेनिंग दरम्यान 2000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल.

रामलल्लाची पूजा ही रामानंदीय परंपरेने होते. या पद्धतीने पूजा करण्याचं ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. उमेदवारांनी गुरुकुल येथून शिक्षा प्राप्त केलेली असावी तसेच रामानंदीय परंपरेनुसार दीक्षा घेतलेली असायला हवी. ट्रेनिंग नंतर उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल.