राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. देशभरातून नाही तर जगभरातून राम मंदिरासाठी भाविक देगण्या देत आहेत. आता राम मंदिरासाठी एका भाविकाने सोन्याचे राम चरित्रमानस भेट दिले आहे. मध्य प्रदेशातील माजी आयएएस अधिकारी सुब्रह्मण्यम लक्ष्मी नारायण यांनी राम मंदिर ट्रस्टला ही भेट दिली आहे. अयोध्येतील राम मंदिरात चैत्र नवरात्रीच्या मुहूर्तावर मंगळवारी या रामचरित्रमानसची स्थापना करण्यात आली. त्याचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.
मध्य प्रदेशातील कॅडरचे माजी आयएसए अधिकारी सुब्रमण्यम लक्ष्मीनारायण आणि त्यांची पत्नी सरस्वती यांनी भेट दिलेली रामचरित्रमानसच्या ताम्रपत्रावर सोन्याच्या अक्षरे आहेत. ही रामचरितमानस रामललांच्या गर्भगृहात ठेवण्यात आले आहे. विधीपूर्वक त्या रामचरित्रमानसची पूजा करण्यात आलीय. ही रामचरित्रमानस एक हजार पानांची आहे. त्याची किंमत पाच कोटी रुपये आहे.
अल्ट्राव्हायोलेट प्रिटींग तंत्रज्ञानाचा वापर करुन सोन्याच्या पानांवर रामचरित्रमानसमधील मजकूर लिहिला गेला आहे. त्याची निर्मिती चेन्नईच्या बुममंडी बंगारु ज्वेलर्सकडून करण्यात आली. या रामचरित्रमानसची निर्मिती करण्यासाठी सुमारे आठ महिन्यांचा कालावधी लागला. या रामचरित्रमानसचे वजन १.५ क्विंटल आहे. त्यात १० हजार ९०२ खंड आहे.
राम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीपासून १५ फूट अंतरावर रामचरित्रमानस ग्रंथाची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना श्रीरामांच्या दर्शनासह या सुवर्णग्रथांचेही दर्शन घेता येणार आहे. राम मंदिरात रामचरित्रमानस ठेवण्यासाठी खास स्टँडही तयार केले आहे, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे न्यासचे महामंत्री चंपत राय यांनी सांगितले.
अयोध्येतील राम मंदिरात रामनवमीला भाविकांना जास्त वेळ दर्शन मिळणार आहे. मंदिर 20 तास खुले राहणार आहे. 15 एप्रित ते 17 एप्रिल दरम्यान ही व्यवस्था असणार आहे. अयोध्येत 100 ठिकाणी एलईडी स्क्रिनवर रामनवमीचे लाइव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. राम नवमीला विक्रमी संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे.