पहिल्याच पावसात अयोध्येच्या राम मंदिराला गळती

| Updated on: Jun 24, 2024 | 10:59 PM

"राम मंदिराचं बांधकाम 2025 पर्यंत पूर्ण झालं तर आनंदच आहे. पण जिथे रामलल्ला विराजमान आहेत, तसेच त्यापुढे जे बांधकाम झालं आहे तिथे पहिल्याच पावसात गळती होत आहे", अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली आहे.

पहिल्याच पावसात अयोध्येच्या राम मंदिराला गळती
पहिल्याच पावसात अयोध्येच्या राम मंदिराला गळती
Follow us on

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या नव्या मंदिरात रामलल्लांचा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम याच वर्षी 22 जानेवारीला पार पडला. या कार्यक्रमाला अवघे सहा महिने होत नाही तेवढ्यात या भव्य मंदिरात प्रभू रामलल्लांची मूर्ती असलेल्या गाभाऱ्यातच पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्वत: अयोध्याचे श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. आचार्य सत्येंद्र दास यांनी राम मंदिर निर्माणाच्या कामाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. “जिथे रामलल्ला विराजमान आहेत तिथेच छताला गळती लागली आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या बांधकामानंतर पहिल्याच पावसात गळती सुरु झाली आहे. फक्त राम मंदिराच्या गाभाऱ्यातच नाही तर मंदिराच्या इतर ठिकाणी देखील गळती होत आहे. त्यामुळे या गळतीची चौकशी होणं अपेक्षित आहे”, असं आचार्य सत्येंद्र दास म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे सध्या 2024 सुरु आहे. पुढच्या वर्षी 2025 आहे. एका वर्षात राम मंदिराचं बांधकाम होणं अशक्य आहे, असं स्पष्ट मत आचार्य सत्येंद्र दास यांनी मांडलं आहे. जिथे रामलल्ला विराजमान आहेत तिथे पहिल्याच पावसात गळती होत आहे. याशिवाय मंदिरातील इतर ठिकाणीदेखील गळती झाली. त्यामुळे आतमध्ये पाणी भरलं होतं, असंही आचार्य म्हणाले आहेत. तसेच पाणी जाण्यासाठी जागा नाही. याशिवाय पाण्याची गळती देखील होत आहे, असं मंदिराचे मुख्य पुजारी म्हणाले आहेत.

आचार्य सत्येंद्र दास नेमंक काय म्हणाले?

“मंदिरातील इतर मुर्तीची प्राण प्रतिष्ठा येत्या 2025 पर्यंत होईल ही खूप चांगली गोष्ट आहे. एकच वर्ष आहे. त्यामुळे ते शक्य नाही. पण तरीही ते तसं सांगत आहेत तर मी ते मान्य करत आहे. 2025 मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण होईल. सर्व मूर्तींची प्राण प्रतिष्ठा होईल हे मला त्यांच्या बातचितमधून समजत आहे. 2025 पर्यंत मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं तर आनंदच आहे. पण जिथे रामलल्ला विराजमान आहेत, तसेच त्यापुढे जे बांधकाम झालं आहे तिथे पहिल्याच पावसात गळती होत आहे. तिथे पाणी भरलं होतं. यावर लक्ष दिलं पाहिजे की, जे बांधकाम झालं आहे तिथे नेमकं काय कमी राहिलंय की, तिथे गळती होत आहे. जे बनलं आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पाणी निघायला जागा नाही आणि काल तर मंदिरात गळतीदेखील होत असल्याचं समोर आलं. या समस्येचं निराकरण आधी केलं जाईल. नाहीतर पाऊस झाल्यावर पूजा, अर्चना, प्रार्थना सर्व बंद होईल’, असं आचार्य सत्येंद्र दास म्हणाले.