नवी दिल्ली | 10 फेब्रुवारी 2024 : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या सुशासन महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली. सुशासन महोत्सव 2024 द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताचं व्हिजनच जनतेसमोर मांडण्यात आलं आहे. गेल्या दहा वर्षात संपूर्ण जगाला नव्या भारताचं दर्शन करता आलं आहे. आज नव्या भारतात 140 कोटी लोकसंख्येच्या जीवनात जे काही बदल झाले आहेत, जे काही परिवर्तन झालं आहे, ती सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासनाची देण आहे, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच अयोध्या सांस्कृतिक नगरी बनतेय, अयोध्येला जगात नवी ओळख मिळत असल्याचंही ते आदित्यनाथ म्हणाले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सुशासन महोत्सवाचे आयोजन केले होते. कालपासून सुरू झालेल्या या महोत्सवाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज या महोत्सवात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सुशासन ही संकल्पनाच अधोरेखित केली. एक भारत श्रेष्ठ भारताची जी परिकल्पना होती, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमुळे साकार झाली. एकेकाळी त्या परंपरेला नावे ठेवली जात होती. आता त्याच परंपरेचा गौरव केला जात आहे. विशेष म्हणजे हे जगभर होत आहे. 21 जून रोजी आपण जागतिक योगा दिवस साजरा करतो. ते केवळ पंतप्रधान मोदींमुळे शक्य झालंय. हजारो वर्षांपासून सुरू असलेल्या कुंभच्या परंपरेला आता युनेस्कोनेही मान्यता दिली आहे. आत प्रत्येक भारतीय आपल्या या परंपरेचा अभिमान बाळगून आहे, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
लष्कर, सुशासन आणि लोककल्याण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीची ओळख आहे. मोदींमुळेच आज आपण आपल्या परंपरेचा गौरव करू शकतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात मोदींनी देशाला कशा पद्धतीने जोडण्याचं काम केलं हे आपण पाहिलंच आहे. देशाच्या स्मारकांच्या संरक्षणाची गोष्ट असेल, स्वातंत्र्यकाळातील नायकांचा सन्मान करणं असेल, गावागावापर्यंत विकास पोहोचवण्याचं असेल… प्रत्येक ठिकाणी मोदींचं व्हिजन दिसून येतं, असंही योगी म्हणाले.
मोदींच्या नेतृत्वामुळेच आपल्या संस्कृतीला वैश्विक ओळख मिळाली आहे. काशी विश्वनाथ धाम असो की ब्रदीनाथ धाम असो, यांच्या पुनरुद्धाराचं काम असेल किंवा महाकालचे महालोक असेल, वा पाचशे वर्षानंतर अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी असेल, ही सर्व मोदींच्या व्हिजनची देण आहे. आज नवी अयोध्या पाहण्याचं भाग्य मिळालंय. जगात अयोध्येला नवी ओळख मिळालीय, असंही ते म्हणाले. पूर्वी लोक अयोध्येला येत नसायचे. आज त्याच अयोध्येत गेल्या 18 दिवसात 40 लाख लोकांनी दर्शन घेतलंय. म्हणजेच जगाला आकर्षित करण्याची क्षमता अयोध्येत आहे. सांस्कृतिक नगरी म्हणून आज अयोध्येची ओळख निर्माण होत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.