जय श्री रामच्या घोषणेमुळे तिघांचा संताप, अयोध्येवरुन येणारी स्पेशल ट्रेन जाळण्याची धमकी

| Updated on: Feb 26, 2024 | 7:16 AM

ayodhya ram mandir | अयोध्येतून म्हैसूरला आलेल्या या ट्रेनमध्ये भाविक जय श्रीरामचा नारा देत होते. त्यावेळी तिघांनी रेल्वे जाळून देण्याची धमकी दिली. त्यामुळे रेल्वेत असणारे भाविक संतप्त झाले.

जय श्री रामच्या घोषणेमुळे तिघांचा संताप, अयोध्येवरुन येणारी स्पेशल ट्रेन जाळण्याची धमकी
Follow us on

बेंगळुरु, दि. 25 फेब्रुवारी 2024 | अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होऊन आता महिनाभर झाला आहे. अयोध्येतील मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत जात आहे. त्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहे. अयोध्यावरुन येणाऱ्या स्पेशल ट्रेनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. अयोध्येतून म्हैसूरला आलेल्या या ट्रेनमध्ये भाविक जय श्रीरामचा नारा देत होते. त्यावेळी तिघांनी रेल्वे जाळून देण्याची धमकी दिली. त्यामुळे रेल्वेत असणारे भाविक संतप्त झाले. त्यांनी त्या तिघांना पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. त्यांना सोडून दिले. यामुळे पुन्हा गोंधळ झाला.

अखेर आरोपींवर गुन्हा दाखल

रेल्वे स्थानकावर गोंधळ वाढल्यानंतर बेल्लारीचे पोलीस अधीक्षक बी.एल.श्रीहरिबाबू घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस अधीक्षक म्हणाले की, या प्रकरणात आम्ही एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधान कायदा कलम 295 अ (धार्मिक भावना दुखवणे), 504 (जाणीवपूर्वक अपमान करणे), आणि 506 (जीवे मारण्याची धमकी देणे) यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच अन्य दोघांचा शोध सुरु आहे.

दरम्यान या प्रकारानंतर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘काँग्रेस व्होट बँकेच्या राजकारणामुळे अशा घटनांना प्रोत्सहान देत आहे. धमक्या देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. या प्रकारानंतर घटनास्थळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आले होते.

हे सुद्धा वाचा

गोध्रा घटनेची आठवण

कर्नाटकातील प्रकारानंतर गोध्रा घटनेची आठवण ताजी झाली. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येतून परतणाऱ्या कारसेवकांना घेऊन येणारी ट्रेन जमावाने जाळली होती. या घटनेत ५९ पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यात 27 महिला आणि 10 मुलेही होती. यानंतर गुजरातमध्ये दंगली उसळल्या होत्या.