Ram Mandir Pran Pratishtha | अयोध्येतील राम मंदिरात काल प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. भव्य राम मंदिर आजपासून भक्तांसाठी खुल झालं आहे. या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हिंदू धर्मात घरवापसी सुद्धा झाली. काल देशात मंगल वातावरण होतं. जय श्रीरामच्या घोषणेने देश दुमदुमला. याचवेळी मध्य प्रदेशच्या अलीराजपुरमध्ये एका मुस्लिम कुटुंबाने प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच हिंदू धर्मात प्रवेश केला. अय्यूब ऊर्फ पीरू भाईने पत्नी आणि दोन मुलांसह हिंदू धर्मात प्रवेश केला. आमचे पूर्वज हिंदू होते, आता आम्ही घरवापसी करतोय, असं अय्यूब खानने सांगितलं. हिंदू धर्म आणि त्यातल्या पूचा अर्चा आपल्याला आवडतात असं अय्यूबने सांगितलं.
22 जानेवारीच्या ऐतिहासिक दिवशी समारंभपूर्वक अय्यूबच्या कुटुंबाचा हिंदू धर्म प्रवेश झाला. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पाय धुतले व अंगवस्त्र घालून हिंदू धर्मात स्वागत केलं. अय्यूब आता राजकुमार आणि त्याची पत्नी करिश्मा या नावाने ओळखली जाईल.
हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय का घेतला?
अय्यूबने आदिवासी युवती करिश्मासोबत निकाह केला होता. मुस्लिम अय्यूबने पत्नीसोबत राहून हिंदू धर्म आणि पूजा पद्धती समजून घेतली. त्यानंतर प्रभावित होऊन विश्व हिंदू परिषदेशी संपर्क साधला. विधी विधानासह त्याने कुटुंबासह हिंदू धर्मात प्रवेश केला. अय्यूबच्या घरवापसीने विहिपचे लोक खूश आहेत.