योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीकडून विविध आयुर्वेदीक उत्पादनांची निर्मिती केली जाते. आता पतंजलीच्या एका उत्पादनाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील यतीन शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. पतंजली कंपनीने आपल्या दिव्य दंत मंजनमध्ये ‘समुद्र फेन’ (कटलफिश) नावाचा मांसाहारी पदार्थ वापरला असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
‘मांसाहारी घटकांचा वापर करूनही त्यांनी उत्पादनाला हिरवं म्हणजेच शाकाहारी लेबल लावलं आहे’ असा याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. चुकीची माहिती दिल्याने आपल्या भावना दुखावल्या म्हणत वकील यतीन शर्मा यांनी ही याचिका दाखल केलीय.
दिव्या दंत मंजन संदर्भात कंपनीचा दावा काय?
कोर्टाने पतंजली आयुर्वेद, पतंजली दिव्य फार्मा आणि बाबा रामदेव यांना नोटीस बजावून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. दिव्या दंत मंजन हे दात आणि हिरड्यांसाठी उत्तम असल्याचा दावा पतंजली वेबसाइटवरुन करण्यात आलाय. दिव्या दंत मंजन पावडरमुळे हिरड्या मजबूत होता. हिरड्या आणि दातांच्या समस्या दूर होतात, असं कंपनीच म्हणणं आहे.