छतरपूर : मध्यप्रदेशातील छतरपूरच्या बागेश्वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्र शास्त्री हे सध्या त्यांच्या लग्नाच्या चर्चेमुळे अधिक चर्चेत आहेत. सोशल मीडियावरील एका बातमीने तर सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. एका एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने बागेश्वर बाबाशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी शपथच या तरुणीने घेतली आहे. आपली शपथ पूर्ण करण्यासाठी ही तरुणी गंगोत्री धाम येथून बागेश्वर धामपर्यंत पायी निघाली आहे. येत्या 16 जूनपर्यंत ती बागेश्वर धामपर्यंत पोहोचणार असून तिथे गेल्यावर ती बागेश्वर बाबा ऊर्फ धीरेंद्र शास्त्रींची भेट घेणार आहे. मात्र, या तरुणीच्या निर्धारामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
शिवरंजनी तिवारी असं या तरुणीचं नाव आहे. तीने मीडियाशी चर्चा करताना ही माहिती दिली आहे. मला बागेश्वर बाबांना भेटायचं आहे. तशी माझी इच्छा आहे. त्यासाठीच मी माझी मनोकामना पूर्ण करण्यासाठी बागेश्वर धाम सरकारला भेटायला निघाले आहे. मला माझी बागेश्वर धाम सरकार यांना सांगायची आहे. मात्र, लग्नाच्या विषयावर तिला विचारलं असता तिने थेट उत्तर दिलं नाही. बागेश्वर धाम सरकार सर्व जाणून आहेत. जे होईल, ते वेळ येताच सांगितलं जाईल, असं शिवरंजनीने म्हटलं आहे.
सोशल मीडियावर मात्र शिवरंजनीबाबतच्या अनेक गोष्टी व्हायरल होत आहे. गंगोत्री धामची शिवरंजनीने पायी यात्रा सुरू केली आहे. बागेश्वर बाबाशी विवाह करण्यासाठीच तिने ही पदयात्रा काढल्याचं काही लोक सांगत आहेत. शिवरंजनी बागेश्वर धाममध्ये येणार असल्याने तिच्या शुभचिंतकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या 16 जून रोजी शिवरंजनी बागेश्वरधाममध्ये आल्यानंतर तिच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल की सस्पेन्स कायम राहणार याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे. यापूर्वी कथा वाचक जया किशोरी हिच्या लग्नाचा सस्पेन्स सुरू होता. तसाच हा सस्पेन्स राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एका मुलाखतीत शिवरंजनी हिने बागेश्वर धाम म्हणजे धीरेंद्र शास्त्री यांचा उल्लेख प्राणनाथ केला आहे. ते माझे प्राणनाथ आहेत. 2021पासून मी त्यांना त्याच नावाने हाक मारते. त्यावेळी मी त्यांना पहिल्यांदा भेटले होते, असं तिने सांगितलं.
दरम्यान, शिवरंजनीच्या या भीष्मप्रतिज्ञेवर बागेश्वर बाबांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बागेश्वर बाबा या तरुणीला ओळखतात का तेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, शिवरंजनीच्या दाव्यानुसार ती बागेश्वर बाबांना गेल्या तीन वर्षापासून ओळखत आहे.