बागेश्वर धामचे पीठासीन पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या प्रवचनाच्या कार्यक्रमात आज अचानक चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीतल 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. राजस्थानच्या भीलवाडा जिल्ह्यात संबंधित घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कार्यक्रमासाठी VIP पास घेऊन जाणाऱ्या भाविकांना अडवण्यात आलं. भाविकांकडे व्हीआयपी पास असल्यानंतरही त्यांना आत जाऊ दिलं गेलं नाही. त्यामुळे गेटवर गर्दी इतकी वाढली की, थेट चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली.
या प्रकरणी बनवारी शरण महाराजांनी आयोजकांवर मनमानीचा गंभीर आरोप केला आहे. व्हीआयपी पासच्या नावाने कमिटीने मनमानी केली, असा आरोप त्यांनी केला. काठिया बाबा आश्रम परिसरात बागेश्वर बाबांच्या कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कमिटीने आश्रमच्या बाबांचं ऐकलंच नाही, असा आरोप आता केला जातोय. काठिया बाबा महंत बनवारीशरण महाराजांनी कमिटी आणि पोलिसांवरही आरोप केले.
या घटनेत जखमी झालेल्या महिला चंद्रकला सोमानी यांनी प्रतिक्रिया दिली. “माझ्याकडे व्हीआयपी पास होता. मी बागेश्वर बाबांच्या कथेत सहभागी होण्यासाठी व्हीआयपी गेटवर पोहोचले होते. पण मला आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्यावेळी अनेकजण व्हीआयपी गेटवर जमले होते. त्यांनाही आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळेच तिथे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली”, असं चंद्रकला सोमानी यांनी सांगितलं.
“व्हीआयपी बैठकीच्या ठिकाणी जागा नव्हती मग पास का दिले?”, असा सवाल चंद्रकला सोमानी यांनी केला. “आम्हाला बाबाची कथा ऐकायला मिळाली नाही. याउलट आम्ही जखमी झालो, असं चंद्रकला सोमानी म्हणाले. परिस्थिती इतकी भयानक होती की आम्हाला वाटलं आता आमचा जीव जाईल. पोलीस देखील आमच्यासोबत अरेरावीने बोलत होते”, असा आरोप महिलेने केले.
दरम्यान, आयोजक समितीकडूनही या घटनेवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आयोजक समितीचे संयोजक आशिष यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही व्हीआयपी पास जारी केले होते. पण अनेक जण डुप्लिकेट पास बनवून घेऊन येत होते. त्याच लोकांना आम्ही आतमध्ये जाण्यास रोखत होतो. पण लोकांची मनमानी सुरु होती. अशा लोक व्हीआयपी गेटवर मोठ्या संख्येने जमा झाल्यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. पण पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. जे लोक जखमी झाले त्यांच्यावर तिथेच उपचारही केला गेला, अशी प्रतिक्रिया समितीचे संयोजक आशिष यांनी दिली.