कोलकाता – शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chaterjee)आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee)यांचे बांग्लादेशी कनेक्शन (Bangladesh connection) आता समोर येते आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पैशांचा वापर हवालामार्फत करण्यात येत होता. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या बांग्लादेशमधील नीकटवर्तीयांची माहिती मिळवली आहे. या यादीत बांग्लादेशमधील एक मान्यवर, बांग्लादेशच्या पुंतप्रधान शेख हसीना यांच्या कॅबिनेटमधील एक मंत्री तसेच पंतप्रधानांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या एका माजी सेनाप्रमुखाचेही नाव आहे. या प्रकरणात आलेल्या या बांग्लादेश कनेक्शनमुळे तपास अधिकारीही आश्चर्यात आहेत. आता या प्रकरणात दिल्लीतील मुख्य अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. अर्पिता मुखर्जीच्या घरात जेव्हा छापेमारी करण्यात आली, तेव्हा तिथे एक पांढरी बॅग मिळाली होती. त्या बॅगेवर शेख मुजीबुर रेहमान यांचा फोटो लावलेला होता. त्याचवेळी या प्रकरणाशी बांग्लादेश कनेक्शन असल्याचे तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. या सगळ्या नोटा सेलो टेपच्या माध्यमातून लिफाफ्यात बंद करण्यात आल्या होत्या. साधारणपणे हवाला तस्करी प्रकरणात अशा पद्धतीनेच व्यवहार होतात.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ चॅटर्जी मिळत असलेल्या पैशांतील काही पैसे हे हवालामार्फत बांग्लादेशमध्ये पाठवत होते. या पैशांतून बांग्लादेशात बेनामी नावाने जमीन आणि घरे खरेदी करण्यात येत होती. इतर काही पैसे हे दुसऱ्या देशांतही पाठवले जात असल्याची शक्यता आहे. प्राथमिक चौकशीत यात कोलकत्त्यातील दोन बिझनेस ऑरगनायझेशन्सही सहभागी असल्याचे निष्पन्न झालेले आहे. या दोन्ही कंपन्या पार्थ चॅटर्जी यांच्या मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी होत्या, असा ईडीचा दावा आहे. यातील एक कंपनी रेडिमेट गारमेंटशी संबंधित आहे तर दुसरी कंपनी शिक्षणाशी संबंधित आहे. रेडिमेट कपड्यांची कंपनी भारत आणि बांग्लादेश या दोन्ही देशांत व्यवसाय करते. ही कंपनी बांग्लादेशातून काही लोकप्रिय ब्रंडचे कपडे भारतात आणून विकते. तर शिक्षण व्यवसायात सामील असलेली कंपनी बांग्लादेशात इंजिनिअरिंग काँलेज, इंग्रजी शाळा उघडण्याच्या प्रयत्नात आहे.
ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात बांग्लादेशातील एक सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आणि एका राज्यमंत्र्याचे नाव समोर येते आहे. या प्रकरणातील आरोपी अर्पिता मुखर्जी ही नियमितपणे बांग्लादेश दौरे करीत होती, अशीही माहिती समोर आली आहे. बांग्लादेशातील एका मान्यवराशी तिने नजीकचे संबंध प्रस्थापित केले होते, अशीही माहिती समोर येते आहे. त्या मान्यवराच्या माध्यमातून हा भ्रष्टाचाराचा पैसा बांग्लादेशात जात होता का, याचा तपास आता अधिकारी करीत आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेख हसीना यांचा दिल्ली दोरा आहे. या दौऱ्यात त्यांना कोलकत्त्यात येण्यासाठीही आमंत्रित करण्यात आले आहे. हसीना यांच्या भारत दौऱ्याआधी उघड झालेल्या या भ्रष्टाचारामुळे बांग्लादेशाची गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्याची माहिती आहे.