बंगळुरु : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात एका जोडप्याचा लग्नाच्या पहिल्या रात्रीच मृत्यू झाला. संसाराची वेल बहरण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. लग्नाच्या पहिल्या रात्रीच मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. हार्ट अटॅकमुळे हा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला होता. आता अशाच प्रकारची एक घटना बंगळुरुमध्ये घडली आहे. एक जोडपं घराच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळलं. येलहंका चिक्काजाला येथे भाड्याच्या घरात हे जोडप राहत होतं.
एम चंद्रशेखर आणि यू सुधारानी अशी मृतांची नाव आहेत. दोघे येलहंकाजवळ एका हॉटेलमध्ये नोकरीला होते. लवकरच हे जोडप लग्न करणार होतं, असं त्यांच्या मित्रमंडळींनी सांगितलं.
कशामुळे कळलं?
रविवारी संध्याकाळी घराच्या बाथरुममध्ये दोघांचे मृतदेह सापडले. त्यांच्या घरातून कुठलाही आवाज येत नव्हता. काही हालचाल नव्हती, त्यामुळे घर मालकाचा संशय बळावला. दरवाजा ठोठावूनही आतमधून काही प्रतिसाद नव्हता. कोणी दार उघडत नव्हतं. त्यानंतर घर मालकाने याबद्दल पोलीस नियंत्रण कक्षाला कळवलं. पेट्रोलिंग करणारे पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी बाथरुममध्ये एम चंद्रशेखर आणि यू सुधारानी मृतावस्थेत आढळले.
दोघांच्या मृत्यूच कारण काय?
घरातल्या गॅस गीझरमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय आहे. तुम्ही म्हणाल घरातल्या गॅस गीझरमुळे मृत्यू कसा होऊ शकतो?. गॅस गीझर लीक झाल्याने कार्बन मोनोक्साइड श्वसानावाटे शरीरात गेल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
मृत्यूचा व्हेटिंलेशनशी काय संबंध?
गॅस गीझर बसवताना हवा खेळती राहील, अशी व्यवस्था करा, असं पोलिसांनी आवाहन केलय. गॅस गीझरसाठी पुरसे वेंटिलेशन असलं पाहिजे. कारण गॅस गीझरमधून कार्बन मोनोक्साइडची निर्मिती होते. बाथरुममध्ये अनेकदा व्हेटिंलेशनची नीट व्यवस्था नसते.